गळां घालूं गळा ये ग रडूं पोटभरी
पुन्हा जायाचें सासरी चारा दिशीं ५२१
नको ग रडूं गडे होईल सारें भलें
अवंसेचे काळें कोठें राहे ५२२
नको रडूं गडे होईल तुला सुख
प्रार्थीन गजमुख तुझ्यासाठी ५२३
नको रडूं गडे होईल सखी भलें
चिखली कमळें फुलतात ५२४
नको रडूं गडे जरी वरून पाषाण
झिरपे आंतून फुटतील ५२५
मैत्रीणी भेटती हांसती रडती
फिरून दूर जाती संसारात ५२६
मैत्रीणी भेटती जीवाचें बोलती
फिरून दूर जाती संसारांत ५२७
पुत्रनिधनाचें दु:ख दारुण कठीण
बरें त्याहून मरण माये वाटे ५२८
अपत्याला लाभ त्याहून नाहीं सुख
आणि त्याचा ग वियोग त्याच्याहून नाहीं दु:ख ५२९
नको ग बाळें रडूं किती तूं रडशील
पुन्हा ग फुलतील फुलें दारी ५३०
नको नको रडूं डोळे झाले लाल
होईल पुन्हा बाळ सांवळीये ५३१
नको नको रडूं धर गे मनीं धीर
शोभेल पुन्हा घर माझ्या बाळे ५३२
नको नको रडूं रडें आपुलें आंवर
हांसेल तुझें घर तान्हेबाळें ५३३
पुरे हे रडणें धीर ना सखी सांडी
शोभेल पुन्हां मांडी तान्हेबाळानें ५३४
नको नको रडूं पुन्हां कळी ग फुलेल
पुन्हा पाळणा हलेल तुझ्या घरीं ५३५
नको नको रडूं बघ तूं माझ्याकडे
आवरी बाळे रडें विवेकाने ५३६
आंबे मोहरती सारे कुठें ग फळती
फळती तितुके ना पिकती किती सांगू ५३७
दूर ग देशींचा वारा येतो संथ
सुखी आहे तुझा कंथ मनूबाई ५३८
निरोप मी धाडी गोपूबाळाच्या आईला
माझ्या उषाताईला सांभाळावी ५३९
निरोप मी धाडी शंकरपंतांना कानी सांगा
आठ दिवसांची रजा मागा उषाताईला ५४०