मला हौस मोठी ताईबाईला आणावी
नवी पालखी विणावी रेशमाची ५६१
उठा उठा वैनीबाई दारी उजाडलें
आपुल्याला वाण आलें हळदीकुंकू ५६२
माझ्या दारावरून बेलाच्या पाट्या जाती
शंकराची भक्ति मोठी बाप्पाजींना ५६३
माझ्या दारावरून कोण गेली सवाशीण
काजळकुंकू बाळंतीण मामीबाई ५६४
हाती गोटतोडे मागें पुढें सारित होत्यें
भावांना वाढीत होत्यें पंचामृत ५६५
जीवाला देते जीव प्राणाला होते राजी
सखी माय बहीण तुझी गोपूबाळा ५६६
शेवंती फुलली फुलली पाकळी
निघाला आजोळीं गोपूबाळ ५६७
मामाच्या रे घरा नको जाऊं कामावीण
येऊं दे बोलावणं गोपूबाळा ५६८
मामाच्या रे घरा नको जाऊं लडालडा
येऊं दे गाडी घोडा गोपूबाळा ५६९
चंदन चंदन चंदनाची बारा नांवे
उंची चंदन मला घ्यावें भाईराया ५७०
माझ्या अंगणात कोण बैसली दुलाबाई
वडिलांची वाट पाही सुधाबाई ५७१
लगीनसराई कापडाची महागाई
नेस माझा वैनीबाई पीतांबर ५७२
सासूचा सासूरवास नणंदा तुम्ही हळू बोला
माझा दमून भागून कंथ बाहेरूनी आला ५७३
उठा उठा जाऊबाईं दिवे लावा गच्चीवरी
भावोजी हत्तीवरी घरी आलें ५७४
गांवांतल्या गांवांत उषाताईचे सासरे
गाडीला जुंपिली वासरे दादारायाने ५७५
गांवांतल्या गांवांत किती घेशी बोलावणी
अभिमानाच्या बहिणी उषाताई ५७६
आधी मूळ धाडा लांबच्या अक्काबाईंला
जवळच्या सखुबाईला दांडी डोल्या ५७७
माझ्या घरां ग पाहुणी जिलबी केली ग साईची
बहीण माझ्या ग आईची मावशीबाई ५७८
खाऊ मी धाडिला बत्तासा रेवडीचा
भाचा माझा आवडीचा मोरूबाळ ५७९
नदीपलिकडे कोण ग दिसत
हाती तांब्याची परात मावशीबाई ५८०