किती समर्पक दृष्टान्त ! एखादी मैत्रीण म्हणते, “माझा पती म्हणजे लाखातील माणिक.”

शत ग जन्मांची         पुण्याई आली फळां
माझ्या कुंकवाची कळा             सूर्यावाणी ॥
लाखांत एखादा             तसा सखी माझा पती
अनुरक्त परी व्रती             भाग्य माझें ॥

पतीचे प्रेम आहे मजवर, परंतु ते प्रेम संयमी आहे. त्या प्रेमात पावित्र्य आहे. परंतु दुसरी एखादी सांगते :

रुप ना लावण्य             सोडीना कधीं माडी
करीतो नासाडी                 जीवनाची ॥
रात्र ना दिवस             चंदन वेलीला
विळखा मारून राहिला             साप मेला ॥

असे काही अमर्याद व विषयासक्त पती असतात. दु:खाने ती सती म्हणते :

समुद्राच्या कांठी         मोती पोंवळयांच्या वेली
दैवाची उणीव                 कडू वेली हाती आली ॥

जगात का थोडे चांगले तरुण होते ? परंतु माझ्या नशिबी असेच रत्‍न यायचे होते ! ती मैत्रिणीला म्हणते, “असे आहे तरीही मी प्रेम देत्ये. परंतु त्यांना काही नाही. ना प्रेम, ना माया.”

जीवाला देत्यें जीव         जीव देऊन पाहीला
पाण्यांत पाषाण                 अंती कोरडा राहिला ॥
फोडीलें चंदन             त्याच्या केल्या बारा फोडी
स्त्रियांची जात वेडी             पुरुषांना माया थोडी ॥

किती हृदयभेदक आहेत ह्या ओव्या !

पुष्कळ वर्षांनी भेटलेल्या मैत्रिणींना परत यायचे असते सासरी. त्या शेवटचे रडून घेतात :

गळां घालू गळा         ये ग रडूं पोटभरी
पुन्हा जायचे सासरी             चारी दिशी ॥

त्या एकमेकींना धीर देतात. अवसेची पुनव होईल सांगतात :

नको ग रडूं गडे         होईल सारे भलें
अवसेचे काळें                 कोठें राहे ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel