दागिन्यांनी वाके जशी लवली ग केळ
नाजूक फुलवेल उषाताई २०१
नवर्यापरीस नवरी उजळत
सोन्याचे तिला गोट शोभतात २०२
सूनमूख पाहता मांडवी आले ऊन
शालूखाली झांका सून उषाताई २०३
सूनमूख पाहता मांडवी आले ऊन
कडे घ्यावी सून आक्काबाई २०४
सूनमूख पाहता मांडवी आले ऊन
उभी छाया हो करून आक्काबाई २०५
विहिणीविहिणींच्या रस्त्याबिदी झाल्या भेटी
गुलाल तुझ्या ताटी वैनीबाई २०६
चाल माझ्या वैनीबाई पायघड्यांवरून
व्याही तुला ग दुरून हात जोडी २०७
पायघड्या घालिती परटीणी जावाजावा
पायघडयांचा मान घ्यावा आक्काबाई २०८
पायघडया घालिती परटीणी सासवासूना
पायघडयांचा मान तुम्हा वैनीबाई २०९
एका छत्रीखाली दोन वरूमाया
नणंदा भावजया विहिणी झाल्या २१०
वाजंत्री वाजती सनया आलापती
बैसल्या हो पंगती जेवावया २११
हातातील घांस कां हो हातात रहाती
सूनेला आणिती मांडवांत २१२
बघतात सारे बघती टकमक
नवरी लखलख उषाताई २१३
घेऊन ओखाणा नवरी घांस देई
हळूच वर बघे पुन्हा मान खाली होई २१४
घेऊन ओखाणा नवरीला घांस देई
घांस पटकन् तोंडी घेई उषाताई २१५
प्रीतीच्या जावयाला देऊ करा ताटवाटी
बाळे सारे तुझ्यासाठी उषाताई २१६
चोळी शिव रे शिंप्या मोती लाव परातीत
चोळी जाते वरातीत उषाताईच्या २१७
कसले हे बार कशाचे वाजतें
आता वरात निघते उषाताईची २१८
झोपाळयांच्या वरातीला मोत्यांचे घोस लावूं
प्रेमाचे गीत गाऊं उषाताईला २१९
नळे चंद्रज्योती शेकडो लाविती
अंबारीत शोभती वधूवर २२०