तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे : ओव्या
पंढरीसी जातां पंढरी पिवळी
आंत मूर्त सांवळी विठ्ठलाची १
पंढरपुरा जाऊं भेटीला काय नेऊं
तुळशी बुक्क्याची विठ्ठला प्रीत बहु २
जाऊं ग पंढरी उभी राहूं ग भीवरी
तेणें मुक्ति चारी येती हाती ३
पंढरीचा राणा चला पाहायाला जाऊं
संसारांत होऊं कृतकृत्य ४
पंढरपुरांत होतो नामाचा गजर
नादानें अंबर कोंदतसे ५
पंढरपुरांत आषाढी कार्तिकी
सोहळा त्रैलोकीं असा नाही ६
पंढरपुरात विण्याशीं वीणा दाटे
साधूला संत भेटें वाळवंटी ७
वीण्याला लागे वीणा दिंडीला भेटे दिंडी
यात्रेला येती झुंडी पंढरीस ८
टाळ-मृदंगाचा विठूच्या नामाचा
गजर पुण्याचा पंढरीत ९
पंढरपुरीचा घेऊन जाऊं बुक्का
संसारीच्या दु:खा दूर करूं १०
पंढरपुरींच्या घेऊन जाऊं लाह्या
येतील आया-बाया त्यांना देऊं ११
पंढरपुरांत कसला गलबला
चंद्रभागे पूर आला वाट नाही १२
भरली चंद्रभागा बुडाले हरिदास
पितांबराची घाली कास पांडुरंग १३
भरली चंद्रभागा नाव निघाली बुडाया
नेला नारळ फोडाया रखुमाईला १४
भरली चंद्रभागा लिंबू टाका उतार्याला
जाणें आहे सातार्याला भाईरायाला १५
भरली चंद्रभागा उतार दे ग माये
पैलाड जाणें आहे भाईरायाला १६
भरली चंद्रभागा पाणी करी सणासणा
भिजला टाळवीणा विठ्ठलाचा १७
भरली चंद्रभागा पाणी लागलें भिंतीला
चोळी वाळते खुंटीला रखुमाईची १८
पंढरपुरांत कसला गलबला
सत्यभामेने गोविंदाला दान केले १९
पंढरीसी जातां पंढरी लाल लाल
पेरली मखमल विठ्ठलाची २०