मी म्हटले, ''माझं जीवन मला निरर्थक दिसत आहे. जीवनाची नि:सारता पटवण्यासाठीच जणू देवानं मला साभाळलं. माझे सारे अहंकार धुळीत मिळवून, मला केवळ शून्य करण्यासाठी देवाने मला वाचवलं. माझं जीवन फोल आहे. आज मी विचार करतो, की गेल्या चाळीस वर्षात मी काय केलं? ह्या चाळीस वर्षातील चाळीस दिवस, चाळीस घटका, चाळीस क्षण तरी सार्थकी लागले असतील का?
''शेतकरी शेत नांगरतो, जगाला पोसतो, गुराखी गाई-गुरं राखतो, विणकर विणतो, कुंभार मडकी भाजतो, भंगी स्वच्छता देतो, झाडूवाला झाडतो, डॉक्टर औषध देतो, इंजिनियर गटार बांधतो, संघटनाकुशल संघटन निर्माण करतो. कोणी मजुरांच्या संघटना करतात, कोणी शेतक-यांच्या, कोणी विद्यार्थी संघ काढतात, कोणी युवक चळवळ चालवतात. कोणी ग्रामसुधारणा मंडळं काढतात, कोणी साक्षरताप्रसारक संघ काढतात, कोणी खादी संघ चालवतात, कोणी हरिजन सेवाश्रम सुरु करतात. कोणी नवविचार देतात, जगाला स्फूर्ती देतात. कोणी स्त्रियांचे प्रश्न हाती घेतात, कोणी शिक्षण सुधारु पाहातात. कोणी इतिहास संशोधन करतात, कोणी आर्थिक पाहाणी करतात. कोणी सामाजिक अन्यायविरुध्द बंड पुकारतात, कोणी सरकारी जुलमाविरुध्द झेंडा उभारतात; परंतु मी काय करीत आहे? कोणत्या एका ध्येयाला मी वाहून घेतलं आहे? चार दिवस मी काँग्रेसचा प्रचार करतो, चार दिवस आश्रम काढून राहतो. चार दिवस लेखन करतो, चार दिवस रडत बसतो. ज्याच्यासाठी मी जगेन व ज्याच्यासाठी मी मरेन, असं मजजवळ काय आहे? केवळ लिहिणं, मला आवडत नाही. मी पुष्कळसं लिहिलं, तेही तुरुंगात; परंतु लोकांना वाटतं, मी मला लिहिण्याचं वेड आहे. मी मागे पुण्याला होतो ना, तेव्हा मला कुणी भेटलं, की प्रथम विचारीत, 'काय, सध्या लेखनात दंग ना? त्यांचा तो प्रश्न सुरीप्रमाणे माझ्या छातीत घुसे! मला इतर काही सुचेना, म्हणून तुरुंगात लिहिलेलं मी त्या वेळेस पुन्हा नीट लिहून ठेवीत होतो. लिहीत बसणं म्हणजे मरणप्राय दु:ख आहे. परंतु दुसरं काही करता येत नाही. येऊन जाऊन खेडयांतून व्याख्यानं देत फिरणं; परंतु नुसत्या व्याख्यानांचा काय उपयोग? संघटना करता आली पाहिजे. खेडयांतील लोकांजवळ बोललं पाहिजे. त्यांच्या शंका फेडल्या पाहिजेत. मी तर माणसं पाहून घाबरतो. शंका उत्पन्न झाल्या, की पळावं असं वाटतं! खेडयांतील लोकांची आर्थिक स्थिती जर सुधारता येत नसेल तर नुसत्या पोपटपंचीचा काय फायदा? परंतु ती स्थिती मी कशी सुधारणार ? ते मला काही एक जमत नाही खेडयांतील घाण दूर करणं, एवढं एक काम आहे. त्यातही शास्त्राभ्यास हवा. खेडयांत कशा प्रकारचे संडास हवेत, तिथे गटारं कशी बांधावी ह्या सर्व गोष्टीचा विचार येतोच.
''माझं स्थान मला कुठेच दिसत नाही. मला वर्णच नाही. नवीन तेजस्वी सर्वोदयकर विचार देणारा मी ब्राह्मण नाही. अन्यायाविरुध्द तडफेने उठून, बंडाचा झेंडा उभारुन, मरण-मरण करणारा मी क्षत्रिय नाही. देशातील उद्योगधंदे कसे वाढतील, कृषिगोरक्ष्य कसं सुधारेल, ग्रामोद्योग कसे लागतील, मधुसंवर्धन विद्या, कागदाचा धंदा वगैरे कसे पुनरुज्जीवित होतील, ह्यासंबंधी मला काहीही येत नाही. मी केवळ मजुरी करणारा शूद्रही नाही. कारण मजुरीची सवय नसल्यामुळे, तासनतास मी शरीरश्रम करु शकत नाही.