''श्याम, आंघोळ करतोस ना?'' रामने विचारले.
''मला कढत पाणी नको. कढत पाणी मला सोसत नाही,'' मी म्हटले.
''गप्पा मार, तो म्हणाला.
''अरे, खरंच सांगतो. कढत पाण्याने माझ्या अंगावर पुरळ उठतो. लहानपणी डोळे बिघडले होते. तेव्हापासून मी नेहमी थंड पाण्यानेच स्नान करतो,'' मी म्हटले.
''नळाखाली बादली आहे. आटप लवकर,'' तो म्हटले.
''मी स्नान केले. धोतर धुतले. गीतेचे अध्याय म्हणत मी गॅलरीत हिंडत होतो.
''श्याम तुला गीता येते वाटतं रामने विचारले.
''काही अध्याय येतात,'' मी म्हटले
''आपण दोघे पाठ करु हं,'' तो म्हणाला.
रामजवळची इंग्रजी विषयाची पुस्तक मी वाचू लागलो. अडेल तेथे विचारु लागला. रामकडे त्याच्या वर्गातील काही मित्र अभ्यासासाठी आले होते. रामने माझी ओळख करुन दिली.'' हा श्याम हो. माझा अगदी मित्र. ह्याचं संस्कृत, मराठी चागलं आहे. विशेषत: मराठी तर काही विचारुच नका. मराठीचा प्रोफेसर आहे हो तो. कवीही आहे. खरं ना रे?'' असे म्हणून रामने माझा हात आपल्या हातात घेऊन जोराने हलवला. मी काहीच बोललो नाही.
''मराठीतल्या शंका हयांना विचारल्या पाहिजेत,'' एकजण म्हणाला.
''खुशाल विचार. सा-या फेडल्या जातील,'' राम म्हणाला.
ते मित्र गेले. रामचे धाकटे भाऊ शाळेत जाण्याची गडबड करु लागले. आईच्या पाठीमागे 'वाढ. उशीर झाला,'' अशी गर्दी करु लागले.
''राम, मी जेवून येतो,'' मी म्हटले.
''कुठे जाणार जेवायला?'' त्याने विचारले.
''खाणावळीत,'' मी म्हटले.
''आजच्या दिवस आमच्याकडेच जेव की'' तो म्हणाला.
'' अरे, आज काय नि उद्या काय,'' मी म्हटले.
''बरं तर. लवकर ये जेवून,'' तो म्हणाला.
मी घराबाहेर पडलो. खिशात पैसे शाळेत नाव घालण्यापुरतेच हाते. कोठली खाणावळ नि कोठेले काय? मी मनात हिशेब करु लागलो. अर्ध्या आण्याचे डाळे-मुरमुरे सकाळी व अर्ध्या आण्याचे संध्याकाळी. असे केले तर महिन्याला दोन रुपये पुरतील. असेच करावे. मी अध्यो आण्याचे डाळे. मुरमुरे घेतले. जोगेश्वरीच्या देवळात मी ते खात बसलो. तेथील नळाचे थंडगार पाणी प्यालो. थोडा वेळ इकडे-तिकडे भटकून, हसतमुख असा मी घरी आलो.
''चल, श्याम. दाखला आज आला, तर ठीक. नाहीतर वर्गात बसायची परवानगी तरी मिळवू,''राम म्हणाला.
आम्ही दोघे शाळेत गेलो. मी चालकांना भेटलो. त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. '' तुमचं सर्टिफिकेट येताच नाव घालू. 'ब' वर्गात बसा,'' ते म्हणाले.
'अ' वर्गात नाही का घालणार नाव?'' मी विचारले
''त्या वर्गात निवडक मुलं असतात. वार्षिक परिक्षेत तुम्ही चांगले मार्क मिळवा, म्हणजे पुढे सातवीत तुम्हांला 'अ' वर्गात घालू हं.'' ते म्हणाले.
मी बाहेर गेलो. राम बाहेर उभा होता. राम 'अ' वर्गात होता. मला वाईट वाटले. एका शाळेत, एका यत्तेत असूनही एका वर्गात आम्हांला एकत्र बसता येत नव्हते. आणि सातवीत गेलो असतो तरी मला भरपूर मार्क थोडेच मिळाले असते? गणित कच्चे आणि इंग्रजीची सारी पुस्तके येथे नवीन! सातव्या यत्ततेही आम्ही निरनिराळया वर्गातच राहाणार! जवळ असून दूर,दूर असून जवळ!