मी त्या वर्गात जाऊ बसलो. मुले माझ्याकडे बघू लागली. शाळेत अभ्यासााची उजळणी सुरु होती. मुले शंका विचारीत, अडलेले विचारीत. मास्तर शंका निरसन करीत. मी नि:शक होतो! कारण एक तर नवीन होतो; शिवाय येथील नियुक्त पुस्तकेही निराळी. श्रवणभक्ती करीत मी बसे. मधल्या सुट्टीत राम व मी भेटलो. मला भूक लागली होती. ते उंच तीन मजले चढण्या उतरण्याची मला इच्छा नव्हती.
''राम, मी इथेच वाचीत बसतो. तू ये हिंडून,'' मी म्हटले.
''वाच. पास झालं पाहिजे,'' तो म्हणाला.
''रामजवळ राहायचं, तर नापास होऊन कसं चालले? पास झालेलाच रामजवळ राहून शकतो,'' मी म्हटले.
राम गेला. मी वाचीत बसलो.
''तुम्ही कोणत्या शाळेतून आलात?'' एका मुलाने विचारले.
''औंधच्या,'' मी सांगितले.
'' परीक्षा तर जवळ आले. तुमचं कसं होईल?'' त्याने प्रश्न केला.
''मी पास होईन, असं वाटतं,'' मी म्हटले.
मधली सुट्टी संपली. पुन्हा तास सुरु झाले. मी त्या सर्व तासांना इंग्रजीच वाचीत होतो.
सायंकाळी शाळा सुटली, आम्ही घरी आलो.
'श्याम, खायला ये,'' रामने हाक मारली. त्या भावंडांबरोबर मीही थोडे खाल्ले. पाण्याला आधार आला. ते सारे भाऊ बाहेर खेळायला-हिंडायला गेले. मी घरीच होतो. पडल्या-पडल्या वाचीत होतो.
''मी जेवून येतो हं,'' असे सांगून रात्री मी बाहेर पडलो. अर्ध्या आण्याचे डाळे-मुरमुरे घेतले. बुधवारच्या बागेत खात बसलो. ती लोखंडी बाके थंडगार झाली होती. शीतल स्पर्श मला आवडतो. मी सदरा काढून एका बाकावर निजलो. बागेत आता विशेषशी गर्दी नव्हती. मी फराळ केला. नळाचे पाणी प्यालो.
हळूहळू घरी आलो.
राम झोपी गेला होता. मी थोडा वेळ वाचीत बसलो. नंतर झोपलो. दुस-या दिवशी रामच्या मित्रांना 'सुभद्राहरणा' तील आर्या समजावून दिल्या. समास सांगितले. मी त्या मित्रांजवळ थोडे थोडे बोललो. माझ्या मुक्या कंठाला थोडी वाचा फुटली. मी जरा माणसाळलो.
तीन दिवस मी डाळे-मुरमु-या काढले, परंतु चौथ्या दिवशी मात्र मी गळाठून गेलो. शाळेचे तीन जिने मोठया कष्टाने मी चढलो. घेरी येईल असे वाटे. डोळयांसमोर अंधार येई. त्या दिवशी शनिवार होता. शाळ दोन. अडीच वाजता सुटली.
''राम, तू घरी जा. मला एके ठिकाणी जाऊन यायचं आहे,'' असे मी सांगितले. राम गेला. त्याच्या बरोबर मी माझी पुस्तकेही दिली. मी रस्त्यातून कसातरी जात होतो. कोठे जाणार? कोणाकडे जाणार? मी तुळशीबागेच्या राममंदिरात गेलो. रामसमोर उभा रहिलो. ती सुंदर मूर्ती पोटभर पहिली. नंतर एका खांबाजवळ मी बसून राहिलो. सभामंडपातील घडयाळात चार वाजले, तेव्हा मी उठलो. आमच्या शाळेजवळच एक खाणावळ होती. त्या खाणावळीत मी शिरलो. भाजी चिरण्याचे काम तेथे चालले होते.
''काय पाहिजे?'' प्रश्न करण्यात आला.
''जेवण पाहिजे. काही करा; परंतु मला आधी जेवायला वाढा,'' मी म्हटले.
''अजून दोन तास अवकाश आहे,'' मालक म्हणाले.
''मी इथेच बसू का?'' मी विचारले.
''बसा,'' ते म्हणाले.
तेथील चटईवर मी बसलो; परंतु माझ्याने बसवेना. मी तेथे झोपलो. मालक दयाळू दिसले. त्यानी मला तेथे झोपू दिले.