माझे वेडेपण
दिपवाळीची सुट्टी अद्याप होती, मुले गावी गेली होती. माझा वेळ कसा जाणार? पुस्तकांत मी रमू लागलो. लहानपणापासून मला वाचनाचे वेड होते; परंतु वाचायलाच काही मिळत नसे. दापोलीच्या शाळेत असताना' दाभेळकर ग्रंथमाले'ची ती दुर्बोध पुस्तके मला मिळाली होती. त्यात ना रस, ना प्रसाद. त्यातील पुष्कळसे ग्रंथ शास्त्रीय स्वरूपाचे होते; परंतु शास्त्रीय ग्रंथही सुगम व रसाळ करता येतात.
शंकर बाळकृष्ण जोशी यांचे ' ज्योतीर्विलास पुस्तक किती गोड आहे! दापोलिस असताना दोनच मराठी कांदब-या मी वाचल्या होत्या. हरिभाऊ आपटे यांची ती अमर कादंबरी 'उष:काल'मी तेथेच वाचली होती. संबंध रात्रभर जागत बसून वाचली होती. दुसरी कांदबरी म्हणजे'लालन बैरागीण.'
औंधला हरिभाऊच्या 'करमणुकीच्या' फायली मला वाचायला मिळाल्या. 'पण लक्षात कोण घेतो?' ही कादंबरी मी त्यांतूनच वाचली. ही कादंबरी वाचताना मी कितीदा तरी रडलो असेन. सामाजिक कांदब-या 'पण लक्षात कोण घेतो?' व ऐतिहासिक कादंब-या 'उषकाल ह्या शिरोभागी शोभण्यासारखा आहेत. विषयाशी तद्रुपता ह्या दोन्ही पुस्तकांतून उत्कटत्वाने दृष्टीस पडते. हरिभाऊच्या कादंब-या खूप मोठया-मोठया आहेत, त्यांची वर्णने विस्तृत असतात. वाचक ही वर्णने बहुधा सोडून देतो. माझा एक बंगाली मित्र एकदा माझ्याबरोबर हरिभाऊंची एक कांदबरी वाचू लागला; परंतु ते वाडयाचे वर्णनच संपेना. तो मित्र कंटाळला. म्हणाला,''ह्या वाडयातून केव्हा बाहेर पडणार?'' हरिभाऊच्या कांदब-या सुगम आहेत. घरगुती भाषेत लिहिलेल्या आहेत. त्यात प्रसाद आहे. परंतु प्रतिभा कमी वाटते. हरिभाऊ पृथ्वीवरून धावतील परंतु चंडोल होणार नाहीत. मनुष्याच्या हृदयातील अनेक गुंतागुंती त्यांना तितक्या स्पष्टपणे दाखवता येत नाहीत. ते वस्तुथिती उत्कष्टपणे वर्णितील. परंतु व्यक्तीच्या तरंगातील घडामोडी त्यांना उत्कृष्टपणे वर्णिता येणार नाहीत. मानवी हृदयात ते खोल बुडया घेत नाहीत, असे वाटते; परंतु जाऊ दे. हरीभाऊंची पण लक्षात कोण घेतो? ही कांदबरी माझ्या हदयात जाऊन बसली ही गोष्ट खरी.
भवभूतीचे 'उत्तररामचरित' नाटक मी ह्या सुट्टीत वाचून टाकले. एका मराठी भाषातरांच्या मदतीने मी ते वाचले. संस्कृमधली तीन नाटके त्रिभूवन-मोलाची आहेत. 'शाकुंतल', 'उत्तरामचरित व 'मृच्छकटिक'. 'उत्तरामचरिता'त रामाने जनापवादावरून सीतेचा त्याग केल्याची कथा रंगवली आहे. भवभूतीची प्रतिभा व सावधानकुशलता ही ह्या नाटकात कळसाला पोचली आहेत. महात्मा रामाला ह्या नाटकात रडवले आहे. पंचवटीत बारा वर्षानी परत आलेल्या रामाला परित्यक्त सीतेची पदोपदी आठवण होते. वनदेवता वासंती हृदयाला घरे पाडणारे प्रश्न विचारते. करूण उदात्त असा प्रसंग आहे.
रडणारा प्रभू राम म्हणतो,'' पौरजनहो मी रडतो हयांची क्षमा करा. सीतेच्या आसक्तीने मी रडत नाही. परंतु करूणेने रडत आहे.''
करूण म्हणूनि, न स्त्रीकामकामी भुकेला।
भवभूती महाकवी आहे, ह्या नाटकावरून नि:शय अनुभवास येते. किती गोड गोड श्लोक ह्या नाटकात आहेत! निरनिराळया पात्रांचा स्वभावपरिपोष तरी किती उत्कृष्टपणे केलेला आहे. राजर्षी जनक राम-सीता वनात गेल्यापासून निवृत्तमांस झाला आहे. हा उल्लेख किती सहृदय आहे. महात्माजींच्या चळवळीत मुले बाळे तुरंगात असताना कित्येक आई-बापांनी गोड खाण्याचे सोडून दिले होते. हे तुम्हांला ठाऊकच आहे.
'उत्तरामचरिता'ची महती मी तुम्हांला किती सांगू? त्यातील सारे प्रसंग थोडक्यात कसे सांगू? केव्हा तरी आपण त्यासंबंधी बोलू.' शाकुंतल' मी वाचलेच होते. त्याला असलेल्या इंग्रजी प्रस्तावनेच्या आधारे मी त्यावर एक मराठीत निबंध लिहून काढला. आमच्या वक्तृत्वोत्तेजक मंडळातर्फे त्यावर बोलण्याचे मी मनात ठरवले होते. त्यासाठी ही तयारी केली होती.