ते पावसाळयाचे दिवस होते. कधी कधी माधुकरी मागताना पाऊस आम्हांला पुन्हा स्नाने घाली. आमच्या झोळीत पाणी भरे. भाकरी मऊ होई. श्रावण महिन्यातल्या सोमवारी सायंकाळी चार वाजता माधुकरी मागायला जावे लागे. कारण सकाळी उपवास असतो. असे ते दिवस चालले होते.
एकदा एके दिवशी एका घरी मला कोणी विचारले, ''उद्या आमच्याकडे ब्राम्हण येशील कारे?''
''येईन,'' मी म्हटले.
''उद्या तू माधुकरी मागायला येऊ नकासे, ''गोविंदा म्हणाला.
''का? तू एकटा जाणं बरं नाही. मी तुझ्याबरोबर येईन. थोडीच घरं घेऊ,'' मी म्हटले. दुस-या दिवशी मी त्या घरी जेवायला गेलो.
त्या घरात अत्यंत घाण होती. मी जेवायला बसलो. मला सर्वत्र ओंगळपणा दिसत होता. माझ्याने तेथे जेववेना. केव्हा एकदा उठेन असे मला झाले.
''मी उठतो. मला बरं नाही वाटत,'' मी म्हटले.
''बरं उठा,'' यजमान म्हणाले.
मी हात धुतले. हात धुवीपर्यत मला धीर निघेना. उलटी होणार असे वाटू लागले. मागील दारी तर नरक होता जणू!
मला लहानपणापासून ह्या असल्या घाणीची अपार चीड आहे. मला अंगणात कोणी थुंकलेलेही चालत नाही, पण आपल्या लोकांना घाण अंगवळणी पाडायची फारच सवय. भूमातेला काय वाटत असेल, ह्याची हयांना ना खंत, ना खेद.
मी जेमतेम दक्षिणा घेऊन निघालो. तो गोविंदाकडे आलो. गोविंदा व बंडू जेवत होते.
''श्यामराव, काय होतं हो जेवायला? बोंडं होती की नाही?'' बंडूने विचारले.
''लवकरसा आलास?'' गोंविंदा म्हणाला.
''मी अर्धपोटीच उठलो. माझ्याने तिथे जेववेना,'' मी म्हटले.
''का?''
''तिथे सारं घामट नि घाणेरडं होतं. मी पळून आलो,'' मी म्हटले.
''पळपुटा बाजीराव,'' गोविंदा म्हणाला.
''बाजीराव जेवणातून पळत नसे. लढाईतून पळत असहे,''मी म्हटले.
''तू ब्राम्हण शोभत नाहीस,'' गोविंदा म्हणाला.
''मी नाहीच आहे ब्राम्हण,'' मी म्हटले.
''जानवं तर आहे,'' बंडू म्हणाला.
''जानवं मराठेही घालतात,'' मी म्हटले.
''संध्या करतोस ती?'' गोविंदा म्हणाला.
''मी संध्येतले मंत्र म्हणतो ते मला आवडतात,'' मी म्हटले