त्या दिवशी बाहेर गार वारा सुटला होता. पांघरूणे घेऊन आम्ही बसलो होतो. रामची आई शेगडीपाशी शेकत होती. आम्ही बोलत होतो.

''आज बाबूराव नाही आले?'' रामची आई म्हणाली.
''इतक्या थंडीतून ते कसे येतील?'' मी म्हटले.
''गरिबांना थंडी नाही, ऊन नाही,'' राम म्हणाला.
''ते रस्त्यात झोपतील. पृथ्वी त्यांचचं अंथरूण, आकाश त्यांचचं पांघरूण,'' मी म्हटले.

आमचे असे बोलणे चालेले आहे, तोच 'आहे का रे कोणी धर्मी राजा,' हे शब्द आमच्या कानांवर आले.

''अरे बाबूराव आले. त्यांना थांबवा,'' आई म्हणाली.
''बाबूराव, थांबा हं,'' रामने खिडकीतून सांगितले.
''आज तुम्ही थंडीतून कशाला आलेत बाबूराव?'' मी विचारले.
''मी एकटा असतो, तर नसतो आलो,'' तो म्हणाला.
''मग तुमचं कोण आहे?'' रामने विचारले.
''माझी म्हातारी आहे. तिला आता चालवत नाही. तिला दोन घास नकोत का घालायला?'' तो म्हणाला.

''बाबूराव, थांबा. तुम्हांला एक कोट देतोहं,'' असे म्हणून रामने एक जुना कोट काढून त्याला दिला. बाबूरावांनी तो अंगात घातला. कुडकुडणा-या बाबूरावांना कोटाची ऊब मिळाली. प्रेमाची ऊब मिळाली. माणुसकीची ऊब मिळाली. आंधळे बाबूराव! त्यांना आंधळे कोण म्हणेल? स्वत:च्या वृध्द मातेसाठी ते भीक मागत होते! कडाक्याची थंडी बाहेर पडली असतानाही ते काठी टेकीत टेकीत जात होते! आंधळे बाबूराव डोळस होते. कर्तव्याचे डोळे त्यांच्याजवळ होते. मातृप्रेमाची पवित्र दृष्टी त्यांच्याजवळ होती. ती हालू-चालू न शकणारी वृध्द माता आपल्या आंधळया मुलाला किती आशीवार्द देत असेल! तिचे ते आशीवार्द, म्हणजेच बाबूरावांची कवचकुंडले होती. आम्ही दिलेले जीर्ण-शीर्ण कोट बाबूरावांना कितीसे पुरते, कितीसे सांभाळते! बबूराव निघून गेले. आम्ही त्यांना भीक घातली. त्यांनी आम्हांला मातृप्रेमाची महती सांगितली. आम्ही त्यांना कोट दिला, त्यांनी आम्हांला कर्तव्य शिकवले. बाबूराव आमचे गुरू झाले.

दुस-या दिवशी रात्री बाबूराव आमच्या खिडकीखाली येऊन उभे राहिले. घरात काही उरले नव्हते. कारण घरातील राम वगैरेंची जेवणे होत असतानाच मी त्या दिवशी बाहेरून आलो होतो. त्या दिवशी माझा तुळशीबागेतला वार होता. मी कधी कधी उपाशी असतो, अशी अंधुक शंका त्या भ्रातृमंडळाला आली होती; परंतु माझा स्वाभिमान दुखवला जाऊ नये, म्हणून मला ते आता काही एक प्रत्यक्ष विचारीत नसत. त्यांचे जेवण होत आहे, अशा सुमारासच जर मी कधी बाहेरून आलो, तर ते मला थोडेतरी खायला बोलवायचेच.

''श्याम, थोडा भात उरलाय, ये,'' त्यांची आई म्हणायची.
माझ्याने 'नाही' म्हणवत नसे. ते माझे मित्र मुद्दाम थोडे थोडे कमी खायचे, कोणी भात नको म्हणे, कोणी भाकरी नको म्हणे आणि अशामुळे अत्र उरायचे, त्या प्रेमावशिष्ट अन्नाचा श्याम अधिकारी असे. भिकारी श्याम जेवून उरले, तर त्या दिवशी बाबूरावांना मिळायचे!

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel