अकरा वाजून गेले. आम्ही शाळेत गेलो. त्या शाळेतील माझा पहिलाचा दिवस होता. दुमजली शाळा होती. खाली कचेरी होती. मी माझे नाव दाखल केले. मुख्याध्यापकांचे दर्शन झाले. मी सहाव्या इयत्तेच्या वर्गात जाऊन बसलो. सखाराम व मी जवळ जवळ बसलो होतो. वर्गातील मुले माझ्याकडे पाहून हसत होती. मला 'बावळया' का ती म्हणत होती? माझ्या नेसू पंचा होता, त्या माझ्या पंचाचा का ती उपहास करीत होती?
वर्गात काही मुले फेटे बांधून आली होती. काहींनी पाठीवर सोगे सोडले होते, काही मुले वयाने बरीच मोठी होती, पुष्कळांचे विवाह झालेले होते. काहींना तर मुलेही होती. संसारात पडूनही शिकण्याची त्यांना हिंमत होती. मी कोणाजवळ फारसे बोललो नाही.
हेडमास्तर गणित शिकवीत. आमच्या वर्गाचा गणिताचा अभ्यास बराच झालेला होता, भराभर ते गणिते सोडवीत. बीजगणिताचा तास होता. मुले भराभर तोंडी उत्तरे देत, मी नुसता भराभर ते गणिते सोडवीत. बीजगणिताचा तास होता. मुले भराभर तोंडी उत्तरे देत, मी नुसता टकमक पाहात होतो. मी हा अभ्यास कसा भरुन काढणार? इकडची मुले गणितात हुषार दिसतात. किंवा हुषार मुलांसाठीच फक्त हे शिक्षक असतील, असे मनात आले. मी मनात खचून गेलो, गणित नाही म्हणजे काही नाही. ज्याचे गणित चांगले असते, त्याला मान देतात; परंतु माझी मान येथे खालीच राहणार, असे मला वाटले.
मी खट्टू झालो. गणिताच्या तासाला मी रडवेला झालो. मी बाहेर गेलो व गॅलरीत भिंतीला टेकून उभा राहिलो. शून्य दृष्टीने मी समोर पाहात होतो. माझे डोळे भरुन आले. ह्या परक्या प्रांतात माझे केस होणार? मी श्रीमंत नाही, धीमंत नाही. मी फार चळवळया नाही, सर्वांशी मिसळणारा नाही. मी येथे कोणाजवळ मनचे बोलू? कोणावर रागवू, कोणावर लोभवू, कोणाजवळ रडू, कोणाजवळ, हसू? कोणाजवळ मागू, कोणाचे हक्काने घेऊ? सखाराम होता; परंतु त्याच्याशी मी एकरुप होऊ शकलो नसतो.
माझ्या स्वभावात मधली स्थिती नाही. केवळ परिचय मला रुचत नाही. एकतर माझे जिवाभावाचे संबंध जडतील, नाहीतर मी दूर राहीन. दुस-यासाठी सर्वस्व देईन, नाहीतर कधी तेथे जाणारही नाही. ज्याला मी धरीन, त्याला कायमचे धरीन. त्या क्षणापुरते, त्या त्या काळापुरते तरी, त्या त्या व्यक्तीशिवाय मला अन्य काही दिसत नाही. त्या त्या वेळेचे, ते ते मित्र माझे पंचप्राण होतात. त्यांच्य मी आठवणी करीत बसतो. ते जरा दूर गेले, तर खिन्न होतो; परंतु जवळ असले, म्हणजे फार बोलतोच, असेही नाही. कधी बोलू लागलो, म्हणजे वेळ पुरत नाही. कधी सबंध दिवसात मित्राजवळ एक शब्दही बोलणार नाही. नुसते प्रेमाणे बघेन, हसेन. असा मी विचित्र प्राणी आहे. मी तेथे बाहेर उभा होतो. निराधार उभा होतो. इतक्यात घंटा झाली. गणिताचा तास संपला. ते शिक्षक बाहेर जाताच मी हळूच वर्गात जाऊन बसलो. माझे तोंड उतरले होते.
''तुम्हांला गणित समजेना वाटतं?'' शेजारचा मुलगा मला म्हणाला.
''हो,'' मी म्हटले.
''इथे असंच घाईघाईने शिकवतात. माझीसुध्दा तुमच्यासारखीच स्थिती आहे. चार दोन मुलं भराभरा उत्तरं देतात. त्याच्यावर ते शिक्षक प्रसन्न असतात. इतर मुलं बसतात चित्रं काढीत, कोडी सोडवीत,'' तो म्हणाला.
''मी कोकणात ज्या शाळेत होतो, तिथे इतका भाग झाला नाही. तेथे पुस्तकही निराळं होतं,'' मी म्हटले.
'' पुस्तक कोणतंही असलं, तरी उदाहरणं एकाच स्वरुपाची असणार. समजलेलं असलं, म्हणजे कोणतंही पुस्तक असेना, नडत नाही,'' तो मुलगा म्हणाला.