"अशा संपत्तीचा उपभोग घेत असतां माझ्या मनांत असा विचार आला कीं, अविद्वान् सामान्य जन स्वत: जरेच्या तडाक्यांत सांपडणारा असून जराग्रस्त म्हातार्या मनुष्याकडे पाहून कंटाळतो व त्याचा तिरस्कार करितो! परंतु मी स्वत: जरेच्या तडाक्यांत सांपडलों असून त्या सामान्य मनुष्याप्रमाणें जराग्रस्त मनुष्याला कंटाळलों किंवा त्याचा तिरस्कार केला, तर तें मला शोभणार नाही, या विचारानें माझा तारुण्यमद समूळ नाहींसा झाला.

"अविद्वान् सामान्य जन स्वत: व्याधींच्या जबडय़ांत सांपडणारा असून व्याधिग्रस्त मनुष्याकडे पाहून कंटाळतो व तो त्याचा तिरस्कार करतो. परंतु मी स्वत: व्याधीच्या तडाक्यांतून सुटलों नसतां त्या सामान्य जनाप्रमाणे व्याधिग्रस्ताला कंटाळलो किंवा त्याचा तिरस्कार केला, तर ते मला शोभणार नाहीं. या विचारानें माझा आरोग्यमद समूळ नष्ट झाला.

"अविद्वानं सामान्य जन स्वत: मरणधर्मी असून मृत शरीराकडे पाहून कंटाळतो व त्याचा तिरस्कार करितो, परंतु मी स्वत: मरणधर्मी असून त्या सामान्य जनाप्रमाणे मृताला कंटाळलो किंवा त्याच्या शरीराचा तिरस्कार केला तर तें मला शोभणार नाहीं. या विचारानें माझा जीवितमद समूळ गळून गेला."

(अंगुत्तरनिकाय, तिकनिपात.)

या उतार्यावरून आपणांस असें दिसून येईल कीं, बोधिसत्त्वाच्या राहण्यासाठी जरीं तीन प्रासाद होते तरी शद्धोदन राजानें त्याला त्यांत कोंडले नव्हतें; किंवा तो गृहत्याग करील या भीतीनें त्याच्यावर नृत्यांगनांचा खडा पहारा ठेवला नव्हता. सध्यांच्या एखाद्या संस्थानिकाच्या मुलाप्रमाणें सर्व प्रकारची करमणुकीची साधनें त्याला अनुकूल होतीं, तरी त्याचें समाधान झालें नाहीं. जराव्याधिमरणांच्या उग्र स्वरुपांची कल्पना उत्तरोत्तर त्याच्या मनांत दृढ होत गेली आणि त्याचा तारुण्य, आरोग्य व जीवित यांचा मदत नाहींसा झाला.

मज्झिमनिकायांतील अरिथपरियेसनसुत्तांत बुद्ध भगवंतानें आपल्या गृहत्यागाची हकीगत येणेंप्रमाणे कथन केली आहे:-

"भिक्षु हो, मी सुद्धां संबोधिज्ञान होण्यापूर्वी बोधिसत्त्वावस्थेंत स्वत: जन्मधर्मी असतांना जन्माच्या फेर्‍यांत सांपडलेल्या वस्तूंच्या (पुत्र, दारा, दासी, दास इत्यादिकांच्या) मागें लागलों होतों. (म्हणजे माझें सुख त्यांजवर अवलंबून आहे असें मला वाटे.) स्वत: जराधर्मी असतांना, व्याधि धर्मी असतांना, मरणधर्मी असतांना, शोकधर्मी असतांना, जर व्याधि, मरण, शोक यांच्या फेर्‍यांत असतांना, शोकधर्मी असतांना, जरा, व्याधि, मरण, शोख यांच्या फेर्‍यांत पडलेल्या वस्तूंच्याच मार्गे लागलों होतों. तेव्हां माझ्या मनांत असा विचार आला कीं, मी स्वत: जन्म, जरा, मरण, व्याधि व शोक यांनी संबद्ध असतां त्यांनींच संबद्ध जे पुत्रदारादिक त्यांच्या मागें लागलों आहें, हें ठीक नव्हे; तर मग मी या जन्मजरादिकांनीं होणारी हानि पाहून अजात, अजर, अव्याधि, अमर आणि अशोक असेंजें परमश्रेष्ठ निर्वाणपद त्याचा शोध करावा हें योग्य आहे.

"भिक्षु हो, असा विचार करीत असतां कांही कालानें, जरी मी त्यावेळी तरुण होतों. माझा एकहि केंस पिकला नव्हता, भरज्वानींत होतों, आणि माझे आईबाप मला परवानगी देत नव्हते. डोळ्यांतून निघणार्या अश्रुप्रवाहानें त्यांची मुखें भिजली होतीं, ते सारखे रडत होते, तरी मी (त्या सगळ्यांची परवा न करतां) शिरोमुंडन करून, काषाय वस्त्रांनी देह आच्छादून, घरांतून बाहेर पडलों. १ (१ या उतार्याचें शब्दश: भाषांतर केलें नाहीं. पुनरुक्ति गाळून तात्पर्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे.  येथें आईबाप असा उल्लेख आहे. बोधिसत्त्वाची आई सातव्या दिवशींच परलोकवासी झाली होती, तरी तिच्या निधनानंतर महाप्रजापतीनें बोधिसत्त्वाचें पुत्रवत् पालन केल्याचा उल्लेख चुल्लवग्गांत सांपडतो. शिवाय महाप्रजापती बोधिसत्त्वाची मावशी असून सावत्र आई होती, असें वर सांगितलेंच आहे. तेव्हां येथें महाप्रजापतीलाच आई म्हटलें आहे, हें उघड आहे.) (मी संन्यासी झालों.)"
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel