कायावाचामनें दहा पापांचा त्याग करणें, ही निषिद्धशीलांत मुख्य गोष्ट आहे. या दहा पापांना पाली भाषेंत दस अकुसलकम्मपथ असें म्हणतात. तीं हीं:-

(१) प्राणघात (२) अदत्तादान (३) व्यभिचार ही तीन कायिक पापें होत. (१) असत्य भाषण (२) चहाडी (३) कठोर भाषण व (४) व्यर्थ बडबड हीं चार वाचिक पापें होत. (१) परद्रव्यासक्ति (२) क्रोध व (३) नास्तिकता, हीं तीन मानसिक पापें होत. येथें नास्तिकता म्हणजे परोपकार करण्यांत कांहीं अर्थ नाहीं, शील पालन करण्यांत अर्थं नाहीं, समाधिपासून कांहीं लाभ नाहीं, इत्यादि विचार, बाकी अर्थ स्पष्टच आहे. ज्याला आपलें शील पूर्णत्वाला न्यावयाचें असेल त्यानें या दहा पापांचा त्याग अवश्य केला पाहिजे. या दहा पापांचा मनुस्मृतीच्या १२ व्या अध्यायांतहि उल्लेख सांपडतो तो येणेंप्रमाणें:

परद्रव्येष्वभिध्यानं मनसानिष्टचिंतनम।
वितथाभिनिवेशश्र्च त्रिविधं कर्म मानसम् ।।


परद्रव्याचें चिंतन करणें, दुसर्‍याचें वाईट चिंतणें, आणि भलत्यात मार्गाला लागणें (नास्तिकता) हीं तीन मानसिक (पाप) कर्में जाणावी.

पारुष्यमनृतं चैव पैशुन्यं चापि सर्वश: ।
असंबद्धप्रलापश्र्च वाङ्मयं स्याच्चतुर्विधम् ।।


कठोर भाषण, असत्य भाषण, सर्व प्रकारची चहाडी आणि वृथा बडबड हीं चार वाचिक (पाप) कर्मे होत.

अदत्तानामुपादानं हिंसा चैवाविधानत:।
परदारोपसेवा च शारीरं त्रिविधं स्मृतम् ।।

अदत्तादान (चोरी), वेदविहित ऩसलेली हिंसा, व परदारागमन, हीं तीन कायिक पापकर्मे होत.

मनूनें येथें वेदाला विहित असलेली हिंसा हें पाप नव्हें असें म्हटलें आहे. असा भेद करणें बौद्धांस पसंत होणार नाही. हिंसा म्हटली म्हणजे ती वेदविहित असो वा नसो, येथून तेथून सर्व सारखी आहे असें बौद्धांचे म्हणणें. एवढा मतभेद बाजूस ठेवला तर आद्य स्मृतिकारांनी बौद्धमत जसेंच्या तसें उचललें आहे असें दिसून येईल. १ (१ मनुस्मृति इ. स. च्या चवथ्या शतकात लिहिली असावी असें अलिकडील पंडितांनीं ठरविलें आहे. डॉ. भांडारकरांचा A Peep into the Early History of India, (Page ४६) हा निबंध पहावा.) आजकाल वेदविहित अशी हिंसा फारच क्वचित् घडते. पांचपंचवीस वर्षांतून एखादा यज्ञ झाला तर होतो. कालिपूजा, दसरा इत्यादि प्रसंगी होणार्‍या बलिदानास वेदविहित असें म्हणतां येणार नाहीं. तेव्हां वरील दहा पापांचा पूर्णपणें त्याग करण्याचा एखाद्या कर्मठ हिंदुगृहस्थानें निश्र्चय केला असतां स्मृतिग्रंथ त्याच्या आड येणार नाहींत, इतकेंच नव्हे तर वर दिलेल्या मनुस्मृतींतील उतार्‍याचा त्याला बळकट पाठिंबा मिळेल.

आयुर्वेदालाहि या दहा पापांचा त्याग मान्य आहे. अष्टांगहृदयसंहितेच्या २ र्‍या अध्यायात वाग्भट म्हणतात:-

सुखं च विना धर्मात्तस्माद्धर्मपरो भवेत् ।
भक्तया कल्याणमित्राणि सेवेतेतरदूरग: ।।


धर्मावांचून सुख नाहीं, म्हणून धर्मपरायण व्हावें, श्रद्धापूर्वक सज्जनांची सेवा करावी व खलांपासून दूर रहावें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel