‘‘हे अग्निवेस्सन, याप्रमाणें मी परमसुखाचा, परमशांतीचा, निर्वाणाचा शोध करीत करीत मग्ध देशांत फिरत असतां उरुवेलेला२ (२ सध्या ज्याला बुद्धगया असें म्हणतात, तो प्रदेश.) येऊन पोहोंचली. तेथील प्रदेश अत्यंत रमणीय होता. वनशोभा फारच चांगली होती, नदी मंद मंद वाहत होती, आसमंतात कांही अंतरावर गांव वसले होते. या ठिकाणी, हे अग्गिवेस्सन, मी माझे श्वासोच्छवास कोंडून घेत असे. सल श्वासोच्छवास कोंडल्यानंतर माझ्या मस्तकांत भयंकर वेदना उठत असत, पोटांतहि अशाच वेदना उठत असत, व सगळ्या अंगाचा अत्यंत दाह होत असे. परंतु माझा उत्साह दृढ होता. जागृति कायम होती, देह मात्र दुर्बल झाला होता. इतक्या दु:खकारक वेदना होत होत्या तरी त्यांचा माझ्या विचारावर परिणाम होत नसे.

‘‘तदनंतर मीं आहार कमी करण्याचा निश्चय केला. मुगांचा किंवा कुळ्यांचा काढा पिऊनच मी रहात असे. अशा स्थितींत माझा देह अत्यंत कृश झाला. हातापायांच्या काडय़ा झाल्या, पाठीचा कणा स्पष्ट दिसूं लागला, मोडक्या घराच्या वांशांप्रमाणे बरगडय़ा खिळखिळून गेल्या, पाण्यांत पडलेलीं नक्षत्रांची प्रतिबिंबे जशी खोल गेलेलीं दिसतात. त्याप्रमाणें माझ्या डोळ्यांचीं बुबुळें खोल गेलीं होतीं; कडू भोपळा कच्चा कापून उन्हांत टाकिला असता जसां कोमेजून जातो तशी माझी अंगकांति करपून गेली होती, व पोट आणि पाठ एक झाली होती. त्या वेळीं माझ्या मनांत असा विचार आला कीं, या ज्या मी अत्यंत दु:खकारक वेदना अनुभवीत आहे त्यांच्यापेक्षां अधिक दु:खकारक वेदना दुसर्या श्रमणानें किंवा ब्राह्मणाने अनुभविल्या नसतील. परंतु या दुष्कर कर्मानें लोकोत्तर धर्मज्ञान प्राप्त होईल असें मला वाटत नाहीं. याहून दुसरा कोणता तरी निर्वाणप्राप्तीचा मार्ग आहे कीं नाहीं? (घर सोडण्यापूर्वी मी) माझ्या बापाबरोबर शेतांत गेलों असतां जंबवृक्षाच्या छायेंत बसून प्रथम ध्यानाची समाधि साधल्याची मला आठवण आहे, तोच तर निर्वाणाचा मार्ग नसेल ना? या गोष्टींचे स्मरण झाल्याबरोबर, हे अग्गिवेस्सन, तोच मार्ग खरा असावा असें मला वाटूं लागलें. मी माझ्याशींच म्हणालों, त्या समाधिसुखाला मी कां भितो? ते चैनीनें मिळालेलें सुख नव्हे, किंवा पापकारकहि नव्हे. अशा सुखाला मी भितां कामा नये. परंतु या दुर्बल देहानें तें सुख साध्य होणार नाहीं. तेव्हां देहाचें संरक्षण करण्यापुरतें अन्न मी खाल्लें पाहिजे.

तद्नंतर मी देहसंरक्षणाला लागणारें अन्नसेवन करूं लागलों. त्या वेळी माझ्या सेवेसाठी पाच भिक्षू राहत असत. मला जे धर्मज्ञान होईल ते मी त्यांना सांगेल अशी आशा त्यांना वाटत होती. परंतु जेव्हां मी अन्न सेवन करण्यास आरंभ केला. तेव्हां त्यांची निराशा झाली, व मी ढोंगी आहें असें समजून ते मला सोडून चालते झाले. त्या अन्नग्रहणानें हळूहळू माझ्या अंगी शक्ति आली व मी समाधिसुखाचा अनुभव घेऊ लागलों.’’

आळार कालाम व उदक रामपुत्र हे दोघे एका प्रकारच्या योगमार्गाचे प्रवर्तक होते. बुद्धचरितकाव्यांत यांना सांख्यमताचे प्रवर्तक असें म्हटलें आहे; व त्यावरून बौद्धधर्म सांख्यमतापासून निघाला असें विधान कित्येक पाश्चात्य पंडितांनीं केलें आहे. परंतु या त्यांच्या विधानास त्रिपिटकांत कोठेच आधार नाही. अश्वघोषाचार्यानी सांख्यमताची निष्फलता दाखविण्यासाठीं आणि काव्याला शोभा आणण्यासाठी त्यांना सांख्यमतप्रवर्तक बनविलें असावें एवढेंच यावरून सिदध होत आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel