मेत्तं च सब्बलोकस्मिं मानसं भावये अपरिमाणं।
उद्धं अधो च तिरियं च असंबाधं अवेरं असपत्तं ।।३।।

आणि मनामध्यें अपरिमित मैत्रीची भावना करावी; वर, खालीं आणि चारी बाजू प्रेमानें भरून टाकाव्या, त्या प्रेमास कोठेहि अडथळा असूं नये किंवा सपत्न असूं नये!

तिट्ठंचरं निसिण्णो वा सयानो वा यावदस्स विगतमिद्धो।
एतं सति अधिठ्ठेय्य ब्रह्ममेतं विहारं इधमाहु।।


उभा असता, चालत असतां, बसला असतां किंवा अंथरुणावर पडल्यावर जोंपर्यंत नीज आली नाहीं तोपर्यंत ही मैत्रीची भावना जागृत ठेवावी, कारण (पंडित जन) इलाच ब्रह्मविहार असें म्हणतात.

यावरून असें दिसून येईल कीं, ब्रह्मदेव म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता, किंवा उपेक्षा यांपैकीं एखादी मनोवृत्ति होय. आई जशी दूध पिणार्या मुलाचें मैत्रीनें (प्रेमानें) पालन करते, तो आजारी असला तर ती करुणेनें त्याची शुश्रूषा करते, पुढें विद्याअभ्यासादिकांत त्यानें पाटव संपादन केलें असता मुदित अंत:करणाने ती त्याला कुरवाळते, व तो तदनंतर स्वतंत्रपणे संसार करूं लागला किंवा तिच्या मताच्या विरुद्ध वागूं लागला तर ती त्याची उपेक्षा करते; त्याचा ती द्वेष कधींच करीत नाहीं, व त्याला मदत करण्यास तयार नसते असेंहि होत नाहीं;   त्याप्रमाणेंच महात्मे लोक या चार श्रेष्ठ मनोवृत्तींनी प्रेरित होत्साते जनसमूहाचे कल्याण करण्यास तत्पर असतात. ज्या ब्रह्मदेवाला लोक पितामह म्हणतात तो दुसरा कोणी नसून या चार मनोवृत्तींची साक्षात् मूर्ति होय!  तेव्हां आतां बुद्धाजवळ ब्रह्मदेव आला म्हणजे काय? तर या चार मनोवृत्ति त्याच्या मनांत विकास पावल्या. ब्रह्मदेवाची प्रार्थना त्यानें ऐकिली म्हणजे काय? तर त्याच्या अंत:करणांत वास करणार्या अमर्याद प्रेमानें, अगाध करुणेनें सज्जनांविषयीं मुद्रितेनें, आणि जे कोणी त्याचें ऐकणार नाहींत किंवा अकारण शत्रु होतील अशांच्या उपेक्षेनें त्याला सद्धर्माचा प्रसार करण्यास प्रवृत्त केलें.

आळारकालाम व उद्दक रामपुत्र या दोघांस या धर्माचा उपदेश प्रथम करावा असा बुद्धाच्या मनांत विचार आला. कारण ते दोघेहि त्याचा धर्म समजण्यास समर्थ होते. परंतु ते नुकतेच परलोकवासी झाले असें त्याला समजलें. तेव्हां त्यानें आपल्या धर्माचा वर वर्णिलेल्लाय देहदंडनाच्या प्रसंगीं आपणास मदत करणार्या पांच भिक्षूंस प्रथमत:  उपदेश करावा असा निश्र्चय केला. ते भिक्षु या वेळीं वाराणसींतील ऋषिपत्तनांत रहात असत. भगवान् बुद्ध आषाढ पौर्णिमेच्या सुमारास तेथें जाऊन पोंचला. त्याला पाहून ते पांच भिक्षु एकमेकास म्हणाले, “हा ढोंगी श्रमण येत आहे, हा पतित गोतम येत आहे. याचा आम्हीं कोणत्याहि प्रकारें आदरसत्कार करतां कामा नये; एक आसन मात्र येथें टाकून ठेवावें; जर त्याची इच्छा असेल तर तो त्यावर बसेल, नाहीं तर नाहीं.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel