एपिक्यूरस हा परमाणुवादी होता.  ही मीमांसा त्यानें डेमॉक्रिटस नामक पूर्वीच्या ग्रीक तत्त्वज्ञापासून घेतली.  डेमॉक्रिटस ही फारशी कधीं न आढळणारी प्राचीन काळांतली अपूर्व व्यक्ति होती.  एकादें शास्त्रीय सत्य शोधणें हें त्याला एकादें साम्राज्य मिळविण्यापेक्षांहि अधिक महत्त्वाचे वाटे.  असलीं माणसें प्राचीन काळांत फारशीं नव्हतीं.  हें जग कसें तरी यांत्रिक रीतीनें अणुपरमाणूंतून बनलें आहे, या जगाच्या उपपत्तींतच पुष्कळशा महत्त्वाच्या अर्वाचीन शोधांचें बीज आहे.  डेमॉक्रिटसनें जणूं आजच्या पदार्थविज्ञानशास्त्रांतील बर्‍याचशा शोधांची पूर्वकल्पनाच केली होती.

डेमॉक्रिटसच्या या अणुमीमांसेच्या पायावर एपिक्युरसनें आपल्या तत्त्वज्ञानाची इमारत उभारली.  तो म्हणे —आपण सारे अणूंचे संघात आहों, कोठून तरी शुन्यांतून आपण येथें फेंकले गेलों असून पुन: त्या शून्यांतच परत फेंकले जाणार आहों.  हें अणू सदैव खालीं खालीं असे या अनंत शून्यांत (पोकळींत) फिरत राहतात.  कधीं कधीं हे अणुसंघात या किंवा त्या बाजूला कलल्यामुळें संषर्घ होतात.  सूर्यकिरणांतील त्रसरेणू एकमेकांवर आदळतात तद्वतच हें घडतें.  हे अणू नाना रूपांचे व आकारांचे असतात.  हे अखंड भ्रमन्तीमुळें व परस्परांच्या संषर्षांमुळें हळूहळू संघटित होतात व त्यांपासून नाना पदार्थ बनतात.  चंद्र, पृथ्वी, तारे —हें विश्व अशा रीतीनें या अणूंच्या संघातांतून जन्मलें.  आणि आपलें विश्व हें एकच अशा प्रकारचें आहे असेंहि नव्हे. असलीं अनंत आश्चर्यकारक व अवाढव्य जगें, विश्वें, ब्रह्माण्डें आहेत.  त्या दुसर्‍या विश्वांतहि आपल्या पृथ्वीसारखीच पृथ्वी असेल व तीवर पर्वत, समुद्र, मानव, पशू, पक्षी, असतील.  आपणच तेवढे या अनंत समुद्राच्या अनंत किनार्‍यावरील वाळूचे कण आहें असें नव्हे.  कारण, हे अणू पुन:पुन: त्याच त्याच प्रकारच्या समवायांत व संघातांत एकत्र येतात व तशाच वस्तू पुन: पुन: सर्वत्र घडतात.  जेथें जेथें तशी परिस्थिति असेल तेथें तेथें तसेंच वस्तुजात या भ्रमणशील व संघर्षशील अणूंतून निर्माण होतें.  या अणूंची ही अखंड भ्रमंती गति अधोगामी असते.  अणूंची ही सारी हालचाल स्वयंस्फूर्त असते.  तींत कोणा विश्वसूत्रचालकाचा हात नाहीं ; तिला कोणी योजक वा मार्गदर्शक लागत नाहीं.  देवदेवताहि अणूंपासूनच बनतात.  फरक इतकाच कीं, माणसें ज्या अणूंपासून बनतात त्यांपेक्षां हे अणू अधिक शुध्द व निर्दोष असतात.  पण या देवदेवताहि माणसांप्रमाणेंच नाशवंत असतात.  निरनिराळ्या विश्वांमधल्या अनंत अवकाशांत या देवदेवता राहतात, मानवी अस्तित्वाविषयीं त्यांना फिकीर नसते, मानवी जीवनाविषयीं त्यांना फारसें कांही वाटत नाहीं.  शेवटच्या विनाशकालाची—प्रलयाची-वाट पाहत आपण पृथ्वीवर वावरतों, ते स्वर्गांत, इतकाच फरक.  देव व मानव ज्या अणूंतून जन्माला येतात, त्याच अणूंत त्यांचें पुन: पर्यवसान होते.  ज्याअर्थी हे अणू सारखे भ्रमणशील आहेत, एका वस्तूंतून फुटून दुसर्‍या वस्तूंत मिळतात, त्याअर्थी एक गोष्ट सिध्द आहे कीं, हें जग झिजत आहे व एक दिवस ही पृथ्वीहि कोळशाच्या राखेप्रमाणें, विझलेल्या निखार्‍याप्रमाणें शून्य होणार आहे.  विझलेल्या, थंडगार होऊन गेलेल्या अनंत विश्वांच्या उकिरड्यावर ही पृथ्वीहि एके दिवशीं गार होऊन पडेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel