एकदां उंब्रिया गांवच्या शेतांतून घोड्यावर बसून जात असतांना त्याला वाटेंत एक महारोगी भेटला. पूर्वी या जिवंत मढ्यांना पाहून त्याला शिसारी येत असे, तो डोळे मिटीत असे. त्याला जी जी कुरूप वस्तु दिसे त्या त्या वस्तूपासून तो भिऊन व विटून दूर सरे. तो जणूं कवि होता, सौंदर्योपासक होता ! पण तो स्वत: आजारांतून गेला होता. शारीरिक दु:ख म्हणजे काय, रोगामुळें कुरूपता कशी येते, याचा अनुभव त्यानें घेतला होता. त्यामुळें त्याला लोकांच्या कष्टांची, हालअपेष्टांची व रोगांची करुणा वाटूं लागली. जेव्हां त्याच्याकडे येणारा महारोगी त्याला दिसला, तेव्हा तो एकदम प्रेमानें व करुणेनें घोड्यावरून उतरला. त्यानें त्या दु:खीकष्टी रोग्याला जवळचे पैसे दिले, येवढेंच नव्हे, तर स्वत:लाहि त्याला देऊन टाकलें. त्यानें त्याला आपल्या बाहूंनीं कवटाळलें व प्रेमानें त्याच्या सुखदु:खाची चौकशी केली. आतांपर्यंत त्यानें पांढरपेशा सुखी मंडळींतलें आदळआपटीचें, खाण्यापिण्याचें सुख अनुभवलें होतें; पण आतां त्याला निराळेंच शांत व दांत असें सुख अनुभवावयास मिळूं लागलें. परित्यक्तांवर प्रेम करण्यांत व दु:खीकष्टी लोकांच्या संगतींत राहण्यांत एक अधिकच खोल, गंभीर व अत्यंत शांत असा आनंद असतो हें त्याच्या अनुभवास आलें, त्यानें वरिष्ठ वर्गाचा त्याग केला व गरिबांच्या-अनाथांच्या- सेवेत आपणास वाहून घेतलें. ज्यांना जीवनांत अपयश आलेलें असे, जे कोठेंच नीट बसूं शकत नसत, ज्यांना पुढें जातां येत नसे, ज्यांना अशक्तपणामुळें कामकाज करतां येत नसे, दारिद्री व दुबळे असल्यामुळें ज्यांच्याकडे कोणी कधीं लक्ष देत नसे, अशांकडे तो आपली सारी सहानुभूति घेऊन जाई. कोणीं तरी लिहिलें आहे, ''ईश्वरहि ज्यांची हांक ऐकणार नाहीं, अशांचेंहि तो ऐके.'' इतकेंच नव्हें, तर तो याहिपलीकडे जाई. जरी तो निष्ठावंत कॅथॉलिक होता, तरी देवानें दु:खीकष्टी केलेल्यांना सुखी करून देवाची चूकहि दुरुस्त करण्याचें धाडस तो करी.

तो निष्ठावंत कॅथॉलिक असला तरी चर्चचा, येवढेंच नव्हें तर आपल्या पित्याचाहि, आज्ञाधानक पुत्र नव्हता. तो आपल्या मनोदेवतेचा हृदयांतील सूर ऐकावयाला उत्सुक असे. वरिष्ठांपेक्षां त्याचें हृदयच बहुधा अधिक बरोबर असे. एकदां त्याला कोणाला तरी मदत करण्यासाठीं पैसे हवे होते. त्यानें आपला घोडा विकला, तद्वतच पित्याच्या दुकानांतील कापडाचा एक गठ्ठाहि विकला. बापानें त्याला चोर म्हटलें व उपदेशाचे लोटे पाजले. आईबाप किती कष्ट करतात, मुलांना किती प्रेमानें वागवितात, परंतु मुलें कशीं कृतघ्न निपजतात हें बापानें जळजळीत वाणीनें सांगितलें. तो फ्रॅन्सिसला म्हणाला, ''अरें, तुझें सारें, तुझ्या अंगावरचे हे कपडेहि तुझ्या आईबापांच्या कृपेमुळें आहेत, समजलास ?'' पित्याचे शब्द ऐकून फ्रॅन्सिसनें अंगावरचे कपडे काढून त्याच्या समोर फेंकले व त्यानंतर दुसर्‍याच्या दयेवर अवलंबून न राहण्याचें ठरविलें. लोक जर पदोपदीं केलेल्या उपकारांचीं आठवण करून देणार असतील तर त्यांचे उपकार शक्य तों न घ्यावें असें त्यानें ठरविलें. एक फाटका झगा अंगावर घालून तो घरांतून बाहेर पडला. त्या वेळीं हिंवाळा होता. बाहेर सर्वत्र थंडगार धुकें पसरलें होतें. तो त्या कडक थंडींतून गाणें म्हणत जात होता. मालमत्तेच्या बंधनांतून तो कायमचा मोकळा झाला होता. सर्व चीजवस्तू सोडून बाहेर पडल्यामुळें त्याला जणूं मुक्तपणा वाटत होता, अपार आनंद होत होता, जवळच्या किडुकमिडुकांनेंहि जो संतुष्ट असतो तोच खरोखर श्रीमंत होय; ही गोष्ट जर सत्य असेल तर फ्रॅन्सिस बर्नार्डो जगातील सर्वांत श्रीमंत मनुष्य होता. त्याच्यापाशीं कांहींच नव्हतें; तरीहि तो अतीव सुखी होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel