त्याच क्षणीं—त्याच वेळी—एपिक्युरसनें तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याचें नक्की केलें.  ज्या अव्याकृत प्रकृतींतून हें प्रत्यक्ष जगत् निर्माण झालें ती मूळची अव्याकृत प्रकृति कोणीं निर्मिली या प्रश्नाचें उत्तर शोधून काढावयाचें असें त्यानें ठरविलें.

वयाच्या अठराव्या वर्षी तो अथेन्सला गेला.  ती त्याच्या पित्याची जन्मभूमि होती.  तेथें तत्त्वज्ञानांतील नाना पंथांशीं व संप्रदायांशीं त्याचा परिचय झाला, पण कोणत्याच विचारसरणीकडे त्याचें मन आकृष्ट झालें नाहीं.  नंतर तो पूर्वेकडे गेला.  तो कित्येक वर्षे ज्ञानशोध करीत हिंडत होता.  तो ज्ञानाचा यात्रेकरू झाला.  पौर्वात्य देशांतील ज्ञानाच्या सोन्याच्या लगडी आणण्यासाठीं तो मोठ्या उत्सुकतेनें गेला व खरोखरच ज्ञानसंपन्न होऊन वयाच्या पस्तिसाव्या वर्षी अथेन्सला परत आला.  अथेन्सजवळच्या एका खेडेगांवांतलें एक घर त्यानें विकत घेतलें.  त्या घरोभोंवतीं बाग होती.  त्यानें तेथें तत्त्वज्ञान शिकविणारी 'आकाशाखालची' शाळा उघडली.  मोकळी, उघडी शाळा.

तत्त्वज्ञानाचें हें उघडें मन्दिर स्त्री-पुरुष दोघांहिसाठीं होतें.  कोणींहि यावें व शिकावें.  ही संस्था फारच लवकर लोकप्रिय झाली.  एपिक्युरसचे श्रोते त्याचे ईश्वरविषयक नवीन नवीन व आधुनिक पध्दतीचे विचार ऐकून डोलत, तन्मय होत.  ते विचार ऐकून कधीं त्यांच्या मनाला धक्का बसे, तर कधीं अपार आनंद होई.  या विश्वाचें स्वरूप काय, मानवी भवितव्य काय, इत्यादि गहन-गंभीर प्रश्नांवर तो बोले.  भविष्यकालीन म्हणजेच मरणोत्तर जीवन अशक्य आहे हें तो अथेन्समधील तरुण-तरुणींना पटवून देई.  भविष्य जीवन नसल्यामुळें शक्य तितके आनंद व रस या जीवनांतूनच मिळविले पाहिजेत हा विचार तो त्या तरुण श्रोत्यांच्या मनावर बिंबवी.  या मिळालेल्या जीवनाचाच जास्तींत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे असें तो शिकवी व पटवून देई.  आपल्या काळीं तो अत्यंत लोकप्रिय तत्त्वज्ञानी झाला.  त्याची लहानमोठीं तीनशें पुस्तकें त्या वेळेस प्रसिध्द झालीं होतीं.  जे त्याच्या प्रवचनांना उपस्थित राहूं शकत नसत ते त्याचीं पुस्तकें विकत घेत.

एपिक्युरसचीं बहुतेक पुस्तकें नष्ट झालीं आहेत.  परंतु ल्युक्रेशियस नामक प्रतिभावान् कवीनें 'वस्तूंचें स्वरूप' या आपल्या महाकाव्यांत एपिक्युरसच्या तत्त्वज्ञानाची संपूर्ण रूपरेषा दिली आहे.  एपिक्युरसनंतर दोनशें वर्षांनीं ल्युक्रेशियस कवि झाला.  तो रोममध्यें राही.  तो एपिक्युरियन पंथाचा होता.  'वस्तूंचें स्वरूप' हें ल्युक्रेशियसचें महाकाव्य साहित्याच्या इतिहासांतील एक अति अपूर्व व आश्चर्यकारक अशी वस्तु आहे.  वास्तविक हें महाकाव्य अति निष्ठुर तर्कपध्दति शिकविण्यासाठीं लिहिलें आहे ; पण त्यांत ती अत्यंत उत्कट भावनांनीं शिकविण्याचा प्रयत्न करण्यांत आला आहे.  भावनोत्कट भाषेनें निष्ठुर तर्क शिकविणारें हें अपूर्व महाकाव्य 'मनुष्याच्या सुखाव्यतिरिक्त जगांत दुसरी दैवी व उदात्त गोष्ट नाहीं' असें मानणार्‍या एका नास्तिकानें लिहिलें आहे.  तें म्हणजे अधार्मिकांचे/कशावरच विश्वास न ठेवणार्‍यांचें-बायबल होय.

थोडा वेळ आपण ल्युक्रेशियसला भेटीला बोलावूं या व एपिक्युरसच्या तत्त्वज्ञानाची रूपरेषा थोडक्यांत सांगण्याची विनंती त्याला करूं या.  एपिक्युरसच्या मतें जीवनाचा हेतु जीवनांतला आनंद अनुभवणें हा होय.  या जगांत आपणांला दुसरें कर्तव्य नाहीं,  आणखी कसलेंहि काम नाहीं.  आपण दयाघन परमेश्वराची लेंकरें नसून बेफिकीर निसर्गाचीं सावत्र मुलें आहों. हें जीवन म्हणजे या यंत्रमय विश्वांतली एक अकल्पित व आकस्मित घटना होय.  पण आपली इच्छा असेल तर आपणांस हें जीवन सुखमय व रसमय करतां येईल, कंटाळवाणें वाटणार नाहीं असें करतां येईल.  आपणांस आपल्या सुखासाठीं दुसर्‍यावर विसंबून राहून चालणार नाहीं, स्वत:वरच विसंबून राहिलें पाहिजे.  हें विश्व विश्वंभरानें निर्मिलेलें नसून अनंत अशा अवकाशांतल्या अणुपरमाणूंच्या गतींतून तें कसें तरी सहजगत्या बनलें आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel