सीझर रोमवर चालून येत आहे असें ऐकतांच पाँपे पळाला, इतर अधिकारी, कॉन्सल्ट, सीनेटर्स, सारे पळाले ! 'कर्णधारानें सोडून दिलेल्या नावेच्याप्रमाणें रोमची स्थिती होती.' सीझर दरवाजांतून आला व रोममध्यें अराजक आहे असें जाहीर करून शांतता व सुव्यवस्था टिकविण्यासाठीं त्यानें स्वत:ला हुकूमशहा केलें.  त्यानंतर त्यानें शहरची तिजोरी फोडली व तींतील सार्वजनिक पैशाचा उपयोग केला.  आपल्या देशबांधवांसमोर केलेल्या सुंदर भाषणांत तो म्हणाला, ''मी हें सारें तुमच्यासाठीं करीत आहें व जर कोणी मला या लोककल्याणाच्या कार्यांत विरोध करील तर त्याला मी ताबडतोब यमसदनास पाठवीन.''

रोममध्यें आपलें आसन स्थिर करून व तेथें कांहीं संरक्षक शिबंदी ठेवून तो पाँपेचा पाठलाग करीत निघाला.  आपल्या शत्रूचा नि:पात करण्याला तो इतका अधीर झाला होता कीं, तो अत्यंत वेगानें निघाला.  त्याचे शिपाईंहि या अति धांवपळीला कंटाळून जरा कुरकुरूं लागले.  ते आपसांत म्हणत, ''हा सीझर आम्हांला थोडासा विसांवा केव्हां व कोठें देणार ? जरा तरी विसांवा हा देईल का ? आम्हां मानवांविषयीं त्याला कांही सहानुभूति नसेल वाटत तर न वाटो, पण निदान हीं आमचीं चिलखतें, हे आमचे पट्टे यांवर तरी त्यानें करुणा नको का करायला ? सीझरच्या या आघोरी महत्त्वाकांक्षेसाठीं वर्षानुवर्ष ज्या लढाया आखंड चालल्या आहेत त्या लढतां लढतां हीं आमचीं चिलखतें झिजून गेलीं, हीं आमचीं शिरस्त्राणें निस्त्राण झालीं !''

पण रोमन सैन्याची शिस्त कडवी होती.  शिस्तींत वाढलेले असल्यामुळें शिपाई पुन: शांत झाले, तक्रारी मिटल्या व ते सीझरबरोबर ग्रीसच्या उत्तरेकडील थेसिली भागांत गेले.  सीझरनें पाँपेच्या जीर्ण-शिर्ण-विदीर्ण सेनेला गांठून पाँपेचा पुरा मोड केला.  पाँपे पळाला ; गलबतात बसून तो ईजिप्तमध्यें निसटून गेला.

सीझरहि वेळ न गमावतां ईजिप्तकडे निघाला.  तेथें पोंचतांच त्याला दिसलेली पहिली वस्तु म्हणजे भाल्याच्या टोंकावर असलेलें पाँपेचें शिर ! ईजिप्तमधील त्याच्या मित्रांनीं त्याचा त्रास वांचविला.  जांवयाला ठार मारण्याची त्याची चिंता संपली.  जांवयाच्या शिराची भेट ईजिप्तमधील त्याच्या मित्रांनी त्याला दिली !

- ५ -

पाँपे मेला. पण त्यामुळें यादवी संपली असें मात्र नव्हे.  जगाच्या नाना भागांत त्याचे अनेक मित्र नाना प्रकारची कृष्ण कृत्यें करीत होते, बंडाची भाषा बोलत होते.  पण त्यांची खोड मोडण्यापूर्वी तो ईजिप्तमध्येंच टॉलेमीचें राजघराणें नीट व्यवस्थित करण्यासाठीं थोडा थांबला.  टॉलेमी वारला तेव्हां त्याच्यामागें त्याच्याच नांवाचा एक मुलगा होता व आर्सिनो आणि क्लिओपाट्रा नांवाच्या दोन मुली होत्या.  हीं तिन्ही मुलें सिंहासनासाठीं झगडत होतीं.  क्लिओपाट्रा हिनें सीझरची मदत मागितली.  त्या वेळीं सीझर चौपन्न वर्षाचा होता.  त्याला टक्कल पडलें होतें व मधूनमधून फिट्सहि येत असत.  क्लिओपाट्रा तारुण्याच्या ऐन भरांत होती !  तिचें वय अवघें एकवीस वर्षांचें होतें.  सीझरनें तिची विनंती एकदम मान्य केली व तिला ईजिप्तची नि:शत्रु राणी केलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel