१४१५ मध्यें जी अजिनकोर्टची लढाई झाली, तींत इंग्रजांना लॉइरी नदीच्या उत्तरेचे बहुतेक प्रांत मिळालेच होते. संपूर्ण फ्रेंच राज्यावर कबजा मिळविण्यासाठीं इंग्रज उत्सुक होते. पण डॉमरेमी गांवची ही चेटकीण—जोन-त्यांच्या प्रगतीच्या आड येत होती. येवढेंच नव्हे, तर जो कांही फ्रेंच प्रदेश त्यांच्या हातांत होता तोहि ती काढून घेऊं इच्छीत होती. इतक्या श्रमांनीं व इतकें रक्त सांडून मिळविलेला प्रदेश गमावावा लागणार म्हणून ते जळफळत होते. कांहींहि करून जोनला प्रतिबंध झालाच पाहिजे असें त्यांना वाटत होतें.

कांहीं फ्रेंच सरदार या इंग्रजांशीं मसलती करीत होते. चार्लस राजावर इंग्रजांना जय मिळवून देऊन स्वत:चा स्वार्थ साधून घेण्याचा त्यांचा विचार होता. अशा या स्वार्थान्ध व देशद्रोही सरदारांत ड्यूक ऑफ बर्गेडी व फिलिप दि गुड हे दोघे प्रमुख होते. हा 'चांगला' फिलिप वास्तविक 'वाईट' होता : तो अठरा अनौरस मुलांचा बाप होता ! चार्लसला झालेला राज्याभिषेक म्हणजे फिलिपच्या स्वार्थावर मोठा आघात होता. या डॉफिनपेक्षां, या चार्लसपेक्षां फिलिप अधिक श्रीमंत व अधिक कार्यक्षम होता. निदान आपण अधिक लायक आहों असें त्याला वाटे. इंग्रजांच्या संरक्षणाखालीं फ्रान्सचा स्वामी होण्याचा त्याचा बेत होता. पण जोनच्या आगमनानें त्याचे बेत मुळांतच खुडले गेले ! तिच्या या नसत्या ढवळाढवळीबद्दल तिला शासन झालेंच पाहिजे असें इंग्रजांप्रमाणेंच त्याचेंहि मत होतें.

पण तिच्या उघड उघड शत्रूंपेक्षां तिचे मित्र म्हणून मिरविणारेच अधिक धोकेबाज होते. सातव्या चार्लसचे लबाड दरबारी तिला पाण्यांत पाहत होते. विशेषत: राजाचा सल्लागार जॉर्जीस ला ट्रेमाइली हा जोनला फार भीत असे. जोनचा मोकळेपणा व अत्यंत सरळ प्रामाणिकपणा यांची त्याला धास्ती वाटे. ला ट्रेमाइली हा कपटी व जोरदार मनुष्य होता. तो इतरांवर आपली छाप बसवी,  आपलें प्रभुत्व स्थापी. त्यानें आपल्या पहिल्या पत्नीचा त्याग केला होता. दुसर्‍या एका स्त्रीशीं त्यानें पुन: लग्न लावलें व तिच्या पहिल्या नवर्‍याला ठार मारलें. खोटें बोलून व खुशामती करून त्यानें राजाची कृपा संपादिली होती. तो अत्यंत दुष्ट वृत्तीचा दांभिक मनुष्य होता. तो राजालाहि फसवावयाला तयार होता. त्याचें इंग्रजांशीं आंतून सूत होतें. त्याच्या मनांत काय चाललें आहे हें जोनला समजत होतें. ही आपलें कपटकारस्थान राजाला सांगेल अशी त्याला भीति वाटत होती; म्हणून या किसानकन्येला आपल्या मार्गातून कसें दूर करतां येईल याचा विचार तो करीत होता. आपल्या कपटी स्वभावानुसार तो वरपांगी जोनविषयीं अत्यंत आदर दाखवीत होता पण आंतून तिच्या नाशाचीं कारस्थानें रचीत होता.

पण तिच्याविरुध्द उभ्या राहिलेल्या शत्रूंपैकीं सर्वांत भयंकर जर कोणी असतील तर ते भटभिक्षुक व धर्मोपदेशक र्‍हीम्स येथील आर्चबिशप, बोव्हिस येथील बिशप व पॅरिसच्या विद्यापीठांतील एकजात सारे धर्माधिकारी तिला मारूं पाहत होते. चर्चची परवानगी घेतल्यावांचून तिनें लोकांस ईश्वराचे आदेश सांगितले होते. 'मी देवदूतांशीं बोलत्यें' असें म्हणण्याचें धाडस करून तिनें सर्व धर्ममार्तंडांचा आणि उपाध्यायांचा अपमान केला होता. दैवी शक्तिशीं बोलण्याचा अधिकार फक्त या उपाध्यायांचा—धर्मगुरूंचा. ईश्वर व मानव यांच्यांतील दुभाष्याचें काम फक्त चर्चच करूं शकतें, अशी त्यांची प्रामाणिक समजूत असल्यामुळें त्यांना खरोखरच वाटे कीं, जोनला जे आदेश मिळत, ते ईश्वराचे नसून सैतानाचे असले पाहिजेत; देवदूतांचे आदेश चर्चमार्फत आले असते. सैतानाकडून जिला आदेश येतात ती नास्तिक व पाखंडीच असली पाहिजे. ती प्रभुद्रोह करणारी आहे. अर्थात् धर्माला व धर्मगुरुंना तिच्यापासून धोका असल्यामुळें ती ठार मारली गेलीच पाहिजे.

काल्पनिक देवदूतांच्या रक्षणापेक्षां जोनच्या शत्रूंचें कापट्य अधिक प्रभावी ठरलें. काँपेन येथील लढाईंत तिच्याच कांही देशबांधवांनीं तिला पकडून इंग्रजांच्या हवालीं केलें. सोन्याच्या दहा हजार पौंडास त्यांनीं तिला इंग्रजांना विकून टाकलें ! तिच्या मरणाबाबत निश्चिंत होण्यासाठीं इंग्रजांनीं तिला इन्क्विझिशन संस्थेच्या स्वाधीन केलें. आणि अशा रीतीनें जोन युध्दकैदी होती तरी ती धर्मगुरूंच्या ताब्यांत दिली गेली व त्यांच्या न्यायासनासमोर तिचा खटला चालून तिला नास्तिक म्हणून जिवंत जाळण्याची सजा देण्यांत आली !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel