गांधी हे लढवय्ये होते. त्यांनीं आयुष्यभर अन्यायाशीं सतत युध्द चालविलें. कर्मशून्य आणि प्रतिकारहीन शांतिब्रह्माशीं तर त्यांना कांहीं एक करावयाचे नसे. एकादा सेनापति स्वत:च्या फौजांना जसें शिक्षण देतो, तसेंच-तितक्याच दक्षतेनें गांधीं आपलें सैन्य तयार करीत असत. ते लिहितात, ''दुसर्यांस न मारतां स्वत: मरण्याचें शांत व दान्त धैर्य मी माझ्या सैनिकांत उत्पन्न करण्याचा यत्न करीत असतों. माझी श्रध्द आहे कीं, अहिंसा हिंसेपेक्षां अनंतपट श्रेष्ठ आहे, क्षमा शिक्षेपेक्षां अधिक प्रभावी आहे. क्षमा शूराला भूषविते.'' हे शब्द कांहीं नवे नाहींत. असे शब्द पुन: पुन: उच्चारले गेले आहेत. हे शब्द उच्चारण्यांत गांधींनीं बुध्दचें अनुकरण केलें आहे. पण गांधींनीं हे शब्द प्रत्यक्ष कृतींत आणून त्या महात्म्याच्या पुढें पाऊल टाकलें. त्या शान्तिप्रिय महात्म्याचे ते शब्द बरोबर होते असें अश्रध्द जगाला गांधींनीं नीट पटविलें आहे, त्यामुळें सारे सिनिक (संशयात्मे) चकित झाले आहेत.
गांधींनीं एक मोठा विजय आधींच मिळविला होता. हिंदुस्थानांत त्यांनीं जें नवें युध्द मांडलें तें अपेशी होणार असें भविष्य पुष्कळ लोकांनीं वर्तविलें होतें व हिंदुस्थानांतील या अहिंसक युध्दाची भरपूर टिंगल केली होती. पण अफ्रिकेंत गांधी अशीच एक लढाई लढले होते व तींत विजय झाले होते ही गोष्ट हे टीकाकार विसरून गेले होते. लंडन-विद्यापीठांत कायद्याचा अभ्यास करून ते हिंदुस्थानांत आले व १८९३ सालीं वकिली करूं लागले. पण एका महत्त्वाच्या खटल्यासाठीं दक्षिण आफ्रिकेंत प्रिटोरिया येथें त्यांना बोलावण्यांत आलें. या वेळीं गांधींचे वय फक्त चोवीस वर्षांचें होतें.
थोड्या महिन्यांतच ते आफ्रिका सोडून जाणार होते; पण एकवीस वर्षे ते तेथें राहिले. आफ्रिकेंत दीड लक्ष हिंदी लोक होते. तेथें त्यांचा अपमान करण्यांत येई, त्यांच्यावर जुलूम करण्यांत येई, त्यांना गुलाम म्हणून वागविण्यांत येई. गांधींनी या सर्वांची संघटना करून त्यांच्यांत शक्ति उत्पन्न केली व अहिंसक लढा सुरू केला. इतिहासांतील ही असली पहिलीच लढाई होती. रक्तहीन क्रांति करून आपल्या या अहिंसक सेनेला गांधींनीं विजय मिळवून दिला. कोणतें तत्त्व डोळ्यांसमोर ठेवून गांधी वागत होते ? शत्रूला न मारतां त्याला जिंकून घ्यावयाचें असें गांधींचें धोरण होतें. सामान्य शिपाई शत्रूवर विश्वास ठेवीत नसतो. पण गांधींजीं शत्रूवरहि नेहमीं विश्वास ठेवीत. म्हणून ते शत्रूविरुध्द अहिंसा, अक्रोध व असहकार हीं तीनच शस्त्रें वापरीत. दुसर्यांवर जुलूम करणार्या माणसाकरिता किंवा माणसाबरोबर कांहींहि करावयाला ते तयार असत. संपूर्ण असहकार हें त्यांचें धोरण असे. दक्षिण आफ्रिकेंतील सर्व हिंदी जनतेला अन्यायाविरुध्द सार्वत्रित संप करण्याला त्यांनीं प्रवृत्त केलें. 'शत्रूला शारीरिक अपाय करूं नका.' ही त्यांनीं आपल्या सैनिकांना शिकवलेली दुसरी गोष्ट. कारण, त्यांचा लढा व्यक्तीविरुध्द नसून व्यक्तीच्या हृदयांत लपून बसलेल्या पशुतेविरुध्द असे. 'शत्रू संकटांत असतील तेव्हां त्यांना साह्य करीत जा.' ही त्यांनीं आपल्या सैनिकांना शिकविलेली तिसरी गोष्ट. दक्षिण आफ्रिकेंत सत्याग्रह-संग्राम सुरू असतां जोहान्सबर्ग येथें पलेग उद्भाला. गांधींनी लगेच लढा थांबविला. आपल्या शत्रूंना मदत करण्यासाठीं व सुख-शांति देण्यासाठीं त्यांनीं आपल्या सैनिकांचें शुश्रूषापथक बनविलें.