एकदां तो बीथोव्हेनबरोबर फिरत असतां राजाचा लवाजमा त्याच्या बाजूनें जवळून गेला. बीथोव्हेन स्वत:ची कला पूजिण्यापलीकडे कशाचीच पर्वा करीत नसे. तो आपली छाती तशीच रुंद ठेवून त्या लवाजम्यामधून बेदरकारपणें निघून गेला ! पण गटे कलेपेक्षां राजाचा अधिक पूजक असल्यामुळें त्यानें बाजूला होऊन व आपली टोपी काढून अत्यंत गंभीरपणें व नम्रपणें त्याला लवून प्रणाम केला. तो जर्मनीचा खरा सत्पुत्र होता. जगांतील कवींचा सम्राट ही पदवी त्याला प्रिय नव्हती असें नव्हे. त्याला या पदवीचा अभिमान तर होताच, पण कविकुलगुरुत्वाहूनहि जर्मनींतल्या एका तुटपुंज्या राजाचा खासगी चिटणीस म्हणून राहणें त्याला अधिक अभिमानास्पद वाटे.
कार्ल ऑगस्ट राज्य करी त्या प्रदेशाचें नांव सॅक्सेवायमार. त्याचें फक्त सहाशें शिपायांचें सैन्य होतें. पण त्या काळांत सैनिक प्रत्यक्ष कार्यापेक्षां शोभेसाठींच अधिक पाळले जात. कितीहि लहान राजा असला तरी आपण प्रजेला भव्य, दिव्य दिसावें म्हणून तो सैन्य वगैरे लवाजमा ठेवी. प्रजेच्या राजाविषयीं कांहीं कल्पना असतात त्या तृप्त करण्यासाठीं सैन्य ठेवावें लागतें. दुसरा एक राजा होता, त्याच्या सैन्यांत तर सात ऑफिसर व दोन प्रायव्हेट होते ! अठराव्या शतकांतील जर्मनीचा हा असा पोकळ डामडौल तसाच भपका होता. गटे अपूर्व प्रतिभेचा पुरुष असला तरी जर्मन राष्ट्राचा उपरिनिर्दिष्ट दुबळेपणा त्याच्याहि अंगीं होताच. वायमारच्या दरबारात फार काम नसे; त्याचे खांदे वांकण्याची पाळी कधींच येत नसे. दरबारचें वातावरण आनंदी असे. शिकार व बर्फावरून घसरत जाणें या गोष्टी त्यानें लोकप्रिय केल्या. प्रेमप्रकाराला अत्यंत पॅच्शनेबल करमणुकीचें स्वरूप देणारा गटे एका पत्रांत लिहितो, ''आम्ही येथें जवळजवळ वेडे झालों आहों व सैतानीं लीला करीत आहों.'' कार्ल ऑगस्टच्या सेवेंत त्यानें स्वातंत्र्य गमावलें; पण मोठ्या लोकांस क्वचितच लाभणारें विश्रांतीचें, प्रेमाचें, विश्वासाचें व फरसतीचें जीवन त्याला लाभलें. त्याचें घर होतें, त्याची बाग होती. त्याला कशाचीहि कमतरता नव्हती. तो कलोपासक होता, पण सुखासीनहि होता. तो कांहीं 'सत्यासाठीं मरणाला मिठी मारणारा महात्मा अगर संत' नव्हता, तो सौंदर्यासाठीं जगण्याची चिंता करणारा कवि होता.
- ५ -
गटेनें वायमार हें पन्नास वर्षेंपर्यंत जागतिक साहित्याचें केंद्र बनविलें. त्यानें तेथें बुध्दिमान् स्त्रीपुरुष जमवून त्यांच्या नेतृत्वाखालीं तत्त्वज्ञानाच्या चर्चा व वाङ्मयसेवा करण्याचा उपक्रम केला. तेथें ते प्रेमाशीं खेळत. तेथें बांधलेल्या एका छोट्या नाट्यगृहाचा गटे व्यवस्थापक होता. तेथेंच त्यानें त्या शतकांतलीं कांहीं सर्वोत्कृष्ट नाटकें लिहिलीं. तारुण्य होतें तोंपर्यंत त्याचें लिखाण वासनोत्कट व क्षोभकारक होतें. कधीं कधीं तें छचोर व छिनालहि वाटे. 'स्टेला' नामक नाटकांत नायक आपली पत्नी व आपलें प्रेमपात्र दोघांशींहि नीट राहतो व तिघेंहि सुखी आहेत असें दाखवून त्यानें बहुपत्नीकत्वाची तरफदारी केल्याबद्दल बहुजनसमाजानें खूप कावकाव केली; तेव्हां घाबरून गटेनें नाटकाचा शेवटचा भाग बदलून पुन: लिहिला. पत्नी व प्रेयसी दोघींशींहि नीट कसें राहावें हें कळेनासें झाल्यामुळें नायक डोक्यांत पिस्तूल मारून घेऊन—आत्महत्या करून हा प्रश्न सोडवितो अशी कलाटणी गटेनें संविधानकाला दिली.