इतिहास लिहिताना किंवा इतिहासाचा अर्थ लावताना देशाभिमानाची प्रेरणा किंवा तथाकथित देशहिताची कळकळ हिंदी इतिहासकारांनाच येते असे नाही. प्रत्येक देशात सार्या लोकांत जुन्याला सोन्याने मढवून आपल्या हिताकरता इतिहासाची ओढाताण करण्याची बाधा परसलेली दिसते. आपणांस हिंदुस्थानचे म्हणून जे इतिहास पाहावे लागतात ते बहुतेक इंग्रजांनी लिहिलेले असतात. ब्रिटिश सत्तेच्या पूर्वीच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचा तिरस्कार कसातरी जेमतेम झकून केलेले वर्णन आणि ब्रिटिश राज्याची लांबलचक स्तुतिस्तोत्रे, समर्थने यांनीच हे इतिहास भरतात. त्यांच्या दृष्टीने हिन्दी इतिहासाचा खरा आरंभच मुळी इंग्रजांचे या देशात आगमन हा होय. ब्रिटिशांनी अखेर येथे येणे ही जी हिंदुस्थानच्या भाग्योदयाची घटना, तिच्या तयारीसाठीच जणू पूर्वीचा हजारो वर्षांचा इतिहास काही गूढ रीतीने घडत होता. ब्रिटिश आमदानीचा इतिहासही ब्रिटिशांचे वैभव, त्यांचे शौर्य-धैर्य, त्यांचे गुण यांच्या यशोगानासाठीच ओढूनताणून लिहिलेला असतो. हळूहळू इतिहासाकडे पाहण्याची खरी यथार्थ दृष्टी येत आहे व या दृष्टीचा विकास होत आहे. विवक्षित गोष्टी, हेतू मनात ठेवून त्यांना अनुकूल अशा रीतीने इतिहासाची कुतरओढ करणे; आपल्या मनातील विशिष्ट कल्पना, पूर्वग्रह हे सिध्द करण्यासाठी म्हणून उदाहरणे शोधणे, हे प्रकार पूर्वीचा प्राचीन इतिहास लिहितानाच केले जातात असे नाही. आजचा, आपल्या डोळ्यांसमोर घडणारा इतिहासही अशा विकृत रीतीने लिहिण्यात येतो. मग प्राचीन काळाचे किती विकृतीकरणे होत असेल, कशी ओढाताण केली जात असेल त्याची कल्पनाच केलेली बरी.
ते काही असो. परंपरा, ऐकीव हकीकती म्हणजेच इतिहास असे नीट निरीक्षण-परीक्षण न करता, चिकित्सा न करता मानण्याची वृत्ती हिंदी लोकांतच विशेषेकरून अधिक आहे ही गोष्ट खरी. भोंगळपणे विचार करण्याच्या त्या वृत्तीचा आपण त्याग केला पाहिजे. पटकन मत ठोकून देण्याचे हे सोपे मार्ग सोडून दिले पाहिजेत.
परंतु मी कोठेतरी वहावत चाललो. प्राचीन देव-देवता, आख्यायिका, दन्तकथा यांचा कधी, कसा आरंभ झाला ते मी सांगत होतो. त्या काळात जीवन समृध्द होते, परिपूर्ण होते, निसर्गाशी सुसंवादी होते. मनुष्याचे मन या विश्वाच्या रहस्याकडे आनंदाने व कौतुकाने बघत होते; पृथ्वी आणि स्वर्ग जवळजवळ होते. ग्रीक देवदेवता त्यांच्या ऑलिंपस पर्वतावरून ज्याप्रमाणे कधी मानवांना दंड करायला तर कधी त्यांच्याबरोबर रमायला- खेळायला खाली येत, त्याचप्रमाणे कधी कैलासावरून तर कधी हिमालयाच्या दुसर्या शिखरावरून हिंदी देवदेवताही खाली उतरत, लोकांत मिसळत. या रसरसल्या चेतनेत बहुमोल कल्पना-विलासामुळे पुराणे, आख्यायिका यांचे अपार पीक आले, सुंदर बलवान देवदेवता जन्माला आल्या, कारण ग्रीक लोकांप्रमाणेच प्राचीन भारतीयही प्रफुल्ल जीवनाचे, सौन्दर्याचे भोक्त होते, उपासक होते. प्रो. गिल्बर्ट मरे यांनी म्हटले आहे की, ग्रीक लोकांनी कल्पिलेली ऑलिंपस ही स्वर्गसृष्टी ओतप्रोत लावण्यमय आहे. हिंदी कल्पनाशक्तीने निर्माण केलेल्या त्या प्राचीन सृष्टीला हेच वर्णन लागू पडले. त्या ग्रीक देवदेवता आणि त्यांच्याभावेती उभी केलेली सृष्टी याविषयी मरे लिहितात, ''ही कलावन्तांची स्वप्ने आहेत, त्यांच्या रूपककथा आहेत. या स्वप्नांच्या, ध्येयांच्या, कथांच्या सृष्टीला व्यापून राहिलेल्या काही गूढ अज्ञाताची ती प्रतीके आहेत. या देवांच्या निर्मात्यांनी सोडू म्हटले तरी सुटत नसलेल्या परंपरेतून, त्यांच्या मनाच्या नकळत चाललेल्या खेळातून, त्यांच्या आकांक्षातून ह्या देवदेवतांची सृष्टी निघाली आहे. एखादी तेजोमय, चित्तवेधक कल्पना खरी मानून तिच्यावर जितपत श्रध्दा ठेवावी, तितकी श्रध्दा ठेवून साशंक तत्त्वज्ञान्यांनी आपली नैसर्गिक सावधगिरी बाळगून, या देवांची प्रार्थना करण्याइतपत हे देव आहेत. हे देव असे नाहीत की अगदी सत्य समजून त्यांच्यावर कोणी श्रध्दा ठेवतो.'' प्रोफेसर मरे यांनी पुढेही आणखी जे लिहिले आहे ते हिंदुस्थानलाही लागू आहे. ''मनुष्याने कोरलेली सर्वांत सुंदर मूर्ती जशी प्रत्यक्ष देव नसते, परंतु देवाची कल्पना करून द्यायला उपयोगी असे केवळ एक प्रतीक असते; त्याचप्रमाणे प्रत्यक्ष देवाची आपण जी कल्पना करतो तो खरा देव नव्हे, तर जे काही अंतिम सत्यता आहे त्याची कल्पना येण्याला मदत म्हणून ते एक प्रतीक असते... त्या प्रतीकावरून अंतिम सत्याकडे जाताना मध्यंतरी ज्ञानाशी विरोधी असे पंथ त्यांनी निर्माण केले नाहीत. स्वत:च्या सदसद्विवेक बुध्दीच्या प्रकाशाविरुध्द आपल्याला पाप वाटेल असे करायला लावणारी कसलीही आज्ञा, व इतर कोणतेही नियम त्यांनी केले नाहीत.''
आस्ते आस्ते वैदिक देवदेवता मागे पडत चालल्या आणि कठीण व अमूर्त तत्त्वज्ञानाने त्यांची जागा घेतली. परंतु बहुजनसमाजाच्या मन:समुद्रात या देवदेवता तरंगतच होत्या. सुखातील सखे आणि दु:खातील मित्र; मनातील अस्पष्ट अशा ध्येयांची, आशाआकांक्षांची प्रतीके या नात्याने त्या देवदेवता जनतेच्या मनात तशा राहिल्याच आणि त्यांच्याभोवती कवींनी आपल्या कल्पनांची जाळी विणली, आपल्या स्वप्नांची मंदिरे उभारली व त्यात भरगच्च वेलबुट्टी व मनोरम आभासांची चित्रसृष्टी यांची ठायीठायी लयलूट केली. एफ. डब्लू. बेन यांनी हिंदी आख्यायिकांची छोटी छोटी सुंदर पुस्तके लिहिली आहेत, त्यामध्ये या पुष्कळशा आख्यायिका, कवींच्या कल्पना मनोहर रीतीने वापरण्यात आल्या आहेत. त्यातील एक पुढीलप्रमाणे : 'चंद्राची कला' म्हणून गोष्ट आहे. त्यात स्त्री कशी जन्माला आली ते वर्णन आहे. ''देवांचा कारागीर त्वष्टा हा स्त्रीला निर्माण करायला निघाला. परंतु तोपर्यंत पुरुषाला घडविण्यातच सारी साधनसामग्री संपून गेली होती. भरीव मालमसाला, कठीण सामान शिल्लक उरले नव्हते. म्हणून पंचाईत पडली. तेव्हा त्वष्टा गंभीर समाधी लावून अंतर्ज्ञानाने पाहू लागला व समाधी उतरल्यावर पुढीलप्रमाणे सामग्री त्याने गोळा केली. चंद्राचा वाटोळेपणा, आणि लतावेलींची वक्रता, नवांकुरांचे बिलगणे आणि तृणपर्णांचे थरथरणे, लव्हाळ्याचा बारीकपणा आणि फुलांचा तजेला, पानांचा हलकेपणा, हत्तींच्या सोंडेचे निमुळते होत जाणे; हरणांचे कटाक्ष आणि भृंगवृंदांचे चिटकणे, सूर्यकिरणांची आनंदी क्रीडा आणि मेघांचे अश्रू, वार्याची चंचलता आणि सशाचा भित्रेपणा; मोराची ऐट, पोपटाच्या वक्ष:स्थळाची मृदुता, आणि वज्राची कठोरता, मधाची मधुरता व वाघाची क्रूरता, अग्नीची ऊब आणि हिमाची शितलता, पाखरांची किलबिल आणि कोकिळेचे कूजन, बगळ्याचे ढोंग आणि चक्रवाकाची निष्ठा— हे सारे प्रकार एकात एक मिसळून त्या देवांच्या त्वष्ट्याने स्त्री बनविली आणि पुरुषाला दिली.''