कांबोडियातील अक्षरे दक्षिण हिंदुस्थानी आहेत, शेकडो संस्कृत शब्दही थोड्याफार फरकाने त्यांनी घेतले आहेत.  अर्वाचीन कांबोडियातील दिवाणी व फौजदारी कायदा हिंदुस्थानातील प्राचीन स्मृतिकार मनु याच्या मनुस्मृतीवरून बौध्दधर्मानुमते थोडासा फरक करून तयार केला आहे.*

परंतु हिंदी परिणाम अधिकात अधिक मोठे दिसून येत असेल तर तो या प्राचीन हिंदी वसाहतीतील भव्य वास्तुशास्त्रावर आणि कलेवर झालेला दिसून येईल.  मूळच्या भारतीय कलात्मक प्रेरणेला येथील वस्तुस्थित्यनुरूप रंगरूप येऊन तिच्याशी त्या देशाच्या विशिष्ट कल्पनाशक्ती, बुध्दिवैभवाचा संगम झाला व त्यामुळे पुढची अंग्कोर व बोरोबुदूर वास्तुकला निर्माण झाली.  जाबा बेटात बोरोबुदूर येथे बुध्दांची सारी चरित्रकथा पाषाणात चित्रे खोदून दाखविली आहे.  दुसर्‍या ठिकाणी विष्णू, राम, कृष्णा यांच्याही पौराणिक कथांतील प्रसंग भिंतीत उठावदार चित्रे कोरून दाखविले आहेत.  ऑस्बर्ट सिट्वेल अंग्कोरविषयी म्हणतो, ''अंग्कोर आज ज्या स्थितीत आहे, त्या स्थितीतही तो जगातील एक मोठा चमत्कार आहे; मानवी कलात्मक प्रतिभेने दगडी खोदकामात गाठलेली ही पराकाष्ठा आहे.  चीनमध्ये जे काही दिसते त्याहून अनंतपटींनी परिणामकारक, सुंदर आणि तसेच कल्पनारम्य असे हे अंग्कोर आहे.''
-------------------------
* बी. आर. चतर्जी यांच्या 'कांबोडियातील हिंदू संस्कृतीचा प्रभाव' (कलकत्ता, १९२८) या पुस्तकातील ए. लेक्लेअर यांच्या उतार्‍यावरून.

पुढे तो आणखी म्हणतो, ''झगझगीत रंगदार पाखरासारखे या संस्कृतीचे पंख सहा शतके फडफडले आणि मग ही संस्कृती इतकी पार नाहीशी झाली की माणसाला तिचे नावसुध्दा आठवत नाही, फक्त हे अंग्कोराचे अवशेष एवढाच त्यातला नुसता पार्थिव जडभाग उरला आहे.'' *

अंग्कोरवटच्या प्रचंड मंदिराभोवती भव्य वास्तूच्या अवशेषांचा अफाट सागर पसरलेला आहे, त्यात कृत्रिम सरोवरे आहेत, कृत्रिम पुष्करिणी आहेत, कृत्रिम कालवे आणि त्यावरचे पूल आहेत.  एक भव्य महाद्वार आहे आणि त्याच्यावर मनुष्याचे एक प्रचंड शिर खोदलेले आहे.  ''त्याचे तोंड कांबोडियन वळणाचे आहे.  त्या सुंदर, हसर्‍या चेहर्‍यावरचे स्मितहास्य असे गूढ आहे की एखाद्या देवीची सौंदर्य व सामर्थ्य त्यात भरले आहे असे वाटते.'' *  हे मुखकमल व त्याच्यावरील ते गूढ, मोहक परंतु प्रक्षोभक स्मित- 'अंग्कोर स्मिता' चा हा नमुना—अन्यत्रही पुन:पुन्हा काढलेला आढळतो.  या महाद्वारातून रस्ता पुढे मंदिराकडे जातो.  ''बेयॉनचे हे देऊळ म्हणजे जगातल्या अत्युच्च कल्पनाशक्तीने निर्माण केलेली एक अपूर्व कलाकृती आहे.  अंग्कोरवटपेक्षाही हे अधिक रमणीय आहे; कारण त्यातील कल्पनाविलास जडसृष्टीपासून अधिक दूरचा, अधिक अशरीर असल्यामुळे एखाद्या गंधर्वनगरीतील हे मंदिर वाटते.  एखाद्या अप्रतिम काव्यात शब्दपंक्तीमधून काढून धरू म्हटले तर हाती न लागणारे जे अर्थसौंदर्य आढळते त्या सौंदर्याने ही कलाकृती ओतप्रोत रंगलेली आहे.'' *

अंग्कोर निर्माण करणारी स्फूर्ती भारतातूनच आली; परंतु या स्फूर्तीला खमेर बुध्दीने अधिक प्रगल्भ आणि विकसित केले; किंवा भारतीय स्फूर्ती आणि खमेर बुध्दी यांच्या मधुर मीलनातून जगातील हा एक चमत्कार निर्माण झाला.  ज्याने हे भव्य मंदिर बांधविले त्या कांबोडियन राजाचे नाव अगदी भारतीय, सातवा जयवर्मा आहे.

डॉक्टर कारिच वेल्स म्हणतो, ''भारताने वाट दाखविण्याची प्रथा संपली तरी भारतीय स्फूर्तीचा विसर पडला नव्हता.  त्यामुळे असे झाले की, भारतीय बंधनातून मोकळ्या झालेल्या खमेर बुध्दीने त्या स्फूर्तीला आपले वळण लावून त्यातून नव्या, रसरशीत चैतन्याने भरलेल्या विशाल कल्पनांची अगदी वेगळी तर्‍हा काढली.  ती पध्दतच वेगळी असल्यामुळे शुध्द भारतीय परिस्थितीतच पूर्ण वाढ झालेल्या कशाशीही तिची तुलना करणे योग्य नाही.

-------------------
*  ऑस्बर्ट सिट्वेलच्या, 'चला, निसटा माझ्याबरोबर —पौर्वात्य आराखड्याचे पुस्तक' यातून हे तिन्ही उतारे घेतलेले आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel