ह्या आधुनिक संस्कृतीच्या मुळाशीच वांझपणा व वंशापकर्षाची लक्षणे निघावीत, असे कोणते दोष ह्या संस्कृतीत आहेत ?  पण तसे पाहू गेले तर हा प्रकार नवीन नाही, यापूर्वीही हेच घडले आहे.  जगाचा पूर्वीचा इतिहास अशा उदाहरणांनी भरलेला आढळतो.  साम्राज्यधारी रोमला जेव्हा उतरती कळा लागली तेव्हा रोमला हीच लक्षणे होत होती, आणि ती अधिकच होती.  मुळात कीड लागण्याचा हा रोग काही युगचक्रानुरूप तर येत नसेल ?  त्याची कारणे शोधून काढून ती आपल्याला नाहीशी करता येतील का ?  आधुनिक औद्योगिक यंत्रप्रवृत्ती व भांडवलशाही समाजरचना हीच त्याची केवळ एकमेव कारणे म्हणावीत तर ही नव्हती तेव्हा सुध्दा पूर्व काळीही हा प्रकार घडलेला आहे.  पण ही यंत्रप्रवृत्ती व समाजरचना हल्ली ज्या स्वरूपात चालली आहे, त्या स्वरूपामुळे अशी काही परिस्थिती येते, असे काही शारीरिक व मानसिक वातावरण निर्माण होते की, ते ह्या वांझपणाच्या व वंशापकर्षाच्या मूळ कारणांना पोषक होणे संभवनीय आहे. ह्या प्रकाराचे मूळ कारण कसले तरी आध्यात्मिक मानवी मनाला, मानवाच्या चितशक्तीला बाधक असे काहीही गूढ असे असले तर आपल्याला फारतर ते समजून घेण्याचा प्रयत्न काय तो करता येईल, किंवा अंत:प्ररेणेने आपल्याला त्याची जाणीवही कदाचित येईल, पण त्याचे निश्चित आकलन करणे कठीणच.  पण ह्याविषयी विचार करू लागले म्हणजे एक गोष्ट मात्र स्पष्टपणे लगेच डोळ्यांसमोर उभी राहते, ती ही की, मातीचा, धरतीमातेचा संबंध मानवाशी राहिला नाही, की मानवी व्यक्तीला, मानवी वंशाला, ते घातुक ठरते.  पृथ्वी व सूर्य, मृत्तिका व ऊन यापासून प्राणशक्तीचा उगम होतो, आणि त्यांना आपण फार काळ अंतरालो तर जीवनशक्ती हळूहळू ओसरत जाते.  औद्योगिक यंत्रमय झालेल्या आधुनिक मानवी समाजाचा मातीशी संबंध तुटला आहे; निसर्गापासून मिळणारा आनंद, मातीने भरलेल्या अंगात मुसमुसणारी शरीरसंपत्ती या आधुनिक मानवी समाजाला लाभत नाही.  ह्या आधुनिक समाजात निसर्गाच्या रमणीयतेची नुसती पोपटपंची चालते.  कधीकधी आठवड्याअखेर सुट्टीच्या दिवशी ती रमणीयता शोधायला लोक जातात, जातील तेथे खेडोपाड्याच्या रानावनातून आपल्या स्वत:च्या कृत्रिम जीवनातील कृत्रिम वस्तूंचा कचरा इकडे तिकडे फेकून देतात, पण त्यांना त्या निसर्गाशी गुजगोष्टी करणे, त्या निसर्गाशी समरस होऊन जाऊन आपणही त्या निसर्गाचाच एक भाग आहोत याची अनुभूती घेणे, जमत नाही.  एखाद्या सर्वमान्य श्रेष्ठ प्राचीन कवीची कविता किंवा ग्रंथकाराचे साहित्य वाचण्याचा, त्यातील रमणीयतेचा प्रत्यक्षानुभव घेण्याचा प्रयत्न करायला जाऊन त्याचा कंटाळा येऊन ते सोडून आपली आवडती कादंबरी किंवा एखादे 'रहस्यमाले'तले 'पुष्प' पुन्हा एकवार घेऊन बसणार्‍या लोकासारखे, हे निसर्गरमणीयता अनुभवायला निघालेले लोक इतर चार लोक म्हणतात म्हणूनच ते करायला निघालेले असतात.  निसर्ग म्हणजे त्यांच्या मते केवळ एकदा त्यावरून दृष्टी फिरवायची आणि त्याचे कौतुक करायचे अशी एक वस्तू; ती पाहून झाली की सुटकेचा श्वास सोडून पुन्हा परत आपल्या नेहमीच्या अड्डयावर हजर व्हायचे ही त्यांची वृत्ती.  प्राचीन ग्रीक किंवा भारतीयांप्रमाणे निसर्गाच्या अंगाखांद्यावर बागडणारी बालके नसून केवळ शिष्टाचार म्हणून कोठल्यातरी लांबच्या नातेवाईकाची कशीबशी भेट घेऊन तो अप्रिय प्रसंग कसातरी निभावून नेणारी ही मंडळी असतात आणि म्हणून निसर्गाच्या समृध्द जीवनाचा, त्यातल्या अनंत नावीन्याचा जो आनंद व अंगप्रत्यंगातून प्राणशक्ती रसरसत असल्याची जी अनुभूती आपल्या पूर्वजांना सहज अनुभवता येत असे, ती या मंडळींना कधी अनुभवता येतच नाही.  तेव्हा आपल्याला नको झालेली सावत्र मुले म्हणून निसर्ग त्यांना लेखतो यात नवल ते काय ?

निसर्गात अनेक देवदेवता भरल्या आहेत, ह्या त्या प्राचीन वृत्तीचा प्रादुर्भाव आपल्यात होणे शक्य नाही खरे, पण अद्यापही आपल्याला कदाचित निसर्ग किती गूढ आहे याची जाणीव करून घेता येईल, निसर्गातला जीवनगुंजारव, त्यातले सौंदर्यसंगीत ऐकता येईल, निसर्गातून चैतन्याचा लाभ करून घेता येईल. हा गुंजारव, हे संगीत, काही ठरीव नेमक्या ठिकाणीच ऐकायला मिळते असे नाही, त्याची आपल्याला ओढ लागली असेल, ते ओळखायला कान तयार असेल तर ते कोठेही ऐकायला मिळेल.  पण काही काही स्थळे मात्र अशी आहेत की तेथे या संगीताची ओळखसुध्दा नसलेले लोक गेले तरी त्यांना सुध्दा ते असे गुंगवून सोडते की, जसा काही ऑर्गनसारख्या एखाद्या वाद्याचा घनगंभीर खर्ज स्वर फार लांबून आलेला त्यांच्या कानात घुमतो आहे जेथे सहज गेले तरी सृष्टिसौंदर्य साक्षात अवतरलेले दिसते, सर्वांगावर मोहिनी हळूहळू न कळत पसरत जाते, अशी निसर्गाची कृपा लाभलेली जी स्थळे आहेत त्यांत काश्मीरची गणना आहे.  काश्मीरविषयी लिहिताना एक फ्रेंच विद्वान एम्. फौशर म्हणतात, ''काश्मीरमध्ये अशी काय मोहिनी आहे की प्रत्येकाला तिची प्रचीती घ्यावीशी वाटते, ज्यांना त्या मोहिनीची चिकित्सा करावी असे वाटत सुध्दा नाही त्यांनाही ती प्रचीती घ्यावीसे वाटते, ते मी आणखी थोडा विस्तार करून सांगू का ?  तेथील वनश्रीचे वैभव, त्या सरोवरातील पाण्याचा स्फटिकासारखा निर्मळपणा, हिमाच्छादित शिखरांचे भव्य सौंदर्य, किंवा तेथल्या अनंत निर्झरांच्या प्रसन्न गुंजारवाने भारलेले मधुर शीतल वातावरण, एवढेच त्या मोहिनीचे कारण नाही.  मार्तंड येथील देवळाचे अवशेष कारेवाच्या टोकावरच्या एखाद्या उंच निमुळत्या भूशिरावर बांधलेल्या सुंदर ग्रीक देवळासारखे वाटतात, तर देवांच्या स्तवन-स्तोत्रांच्या गायनस्पर्धेंत विजयी ठरलेल्या मेळ्यांना मिळणारी पारितोषिके ज्या देवळात वाहिली जावयाची त्या देवळांची लायसिक्रेटससारख्या अभिजात शिल्पकाराने केलेली सुंदर सुबक रचना काश्मीरमधील पायार येथे दहा दगड कोरून एकजागी जोडून बांधलेल्या छोट्याशा देवळात आढळते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel