कॅक्स्टनच्याही पूर्वी स्पेनमधील अरबी मूर लाकडी ठोकळ्यावरून छापीत असत. *  सरकारी फर्मानांच्या नकला करण्यासाठी अशा छापखान्यांचा उपयोग केला जाई.  ठोकळ्यावर छापण्याहून अधिक प्रगती तेथे झालेली दिसत नाही, आणि ही विद्याही हळूहळू पुढे मावळली.  इस्तंबूलची तुर्की सत्ता कितीतरी शतके युरोप आणि पश्चिम आशिया यांत प्रबळ होती, परंतु त्यांच्या दारात तिकडे युरोपमध्ये शेकडो पुस्तके छापली जात होती तरी त्यांनी तिकडे मुळीच लक्ष दिले नाही.  परंतु या मोठ्या शोधाचा उपयोग करून घेण्याची प्रेरणाच मुळी त्यांना नव्हती.  त्याला हेही एक कारण असेल की, कुराण छापणे म्हणजे अधर्म असे मानीत.  कारण छापलेल्या कागदाचा वाटेल तो मग उपयोग करतात; त्याच्यावर पाय देतील, कचर्‍याच्या ढिगार्‍यात तो फेकतील.  म्हणून पवित्र ग्रंथ न छापणेच बरे असे वाटत असेल. ईजिप्तमध्ये नेपोलियनने प्रथम छापखाना आणला, आणि तिथून मग आस्ते आस्ते दुसर्‍या अरब देशांत त्याने प्रवेश केला.

आशिया दमून भागून झोपी गेल्याप्रमाणे वागत असता अनेक गोष्टींत मागे असलेले युरोप मोठ्या घडामोडीने भरलेल्या नवसृष्टीच्या उंबरठ्यावर उभे राहात होते.  तेथे एक नवीनच चैतन्य सर्वत्र संचारले, एक नवीन हालचाल सर्वत्र सुरू झाली व साहसी लोक महासागरावरून सर्वत्र जाऊ लागले.  विचारवंतांची मने, बुध्दी नवीन नवीन दिशांनी जाऊ
लागली.  युरोपातील संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले.  त्या काळात विज्ञानाची प्रगती करण्याकडे फारच थोडे लक्ष दिले गेले, एवढेच नव्हे, तर लोकांनी विज्ञानाकडे पाहू नये असाही प्रचार काही अंशी झाला.  जे सनातनी पध्दतीचे प्राचीन शिक्षण त्या काळी विद्यापीठातून सुरू करण्यात आले त्यामुळे प्रसिध्द सर्वश्रुत शास्त्रीय कल्पनांचा सुध्दा प्रचार बंद पडला.  अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत सर्वसाधारण सुशिक्षित इंग्रज मनुष्य पृथ्वी फिरते हे मानायला तयार नसे असे नमूद आहे; आणि हा प्रकार कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन होऊन गेले त्यानंतरचा, चांगल्या दुर्बिणी तयार होऊ लागल्यावरचा.  जुनी ग्रीक आणि लॅटिन पुस्तके म्हणजे त्यांचे वेद असल्यामुळे पृथ्वी हाच विश्वाचा मध्यबिंदू या टॉलेमीच्या सिध्दान्तालाच ते कवटाळून बसत.  एकोणिसाव्या शतकातील तो थोर इंग्रज मुत्सद्दी ग्लॅडस्टन जरी गाढा विद्वान होता तरी त्याला विज्ञानात काही कळत नसे, आणि त्याला त्याचे आकर्षणही वाटत नसे.  आजही (केवळ हिंदुस्थानातच नव्हे) जगात असे कितीतरी मुत्सद्दी आणि प्रसिध्द सार्वजनिक कार्यकर्ती माणसे असतील की ज्यांना विज्ञानाचा किंवा वैज्ञानिक पध्दतीचा गंधही नसेल.  विज्ञानाचा हरघडी जेथे उपयोग होत आहे अशा जगात ते राहतात, प्रचंड प्रमाणावर कत्तली व विध्वंस करायला ते त्या विज्ञानाचा उपयोगही करतात, परंतु त्यांना स्वत:ला मात्र त्यात काही कळत-वळत नसते.

--------------------------

*  स्पेनमधील अरबांकडे ही छापण्याची कला कशी गेली ते समजत नाही.  चीनमधून मोगलांच्यामार्फत ही कला त्यांच्याकडे बहुधा आली असावी.  उत्तर आणि पश्चिम युरोपमध्ये पुढे पुष्कळ उशिराने ही गोष्ट जाऊन पोचली.  ऐतिहासिक रंगभूमीवर मोगल येण्यापूर्वी कितीतरी आधीपासून अरबी जगाच्या कार्डोव्हा ते कैरो, दमास्कस आणि बगदाद अशा रीतीने घनिष्ठ संबंध होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel