हिंदुस्थानच्या फाळणीचा जो घोष अलीकडे सुरू झाला आहे त्याची ही अशी पूर्वीची पार्श्वभूमी आहे असे मला वाटते. याला अनेक दुसरी कारणे असतील; दोन्ही बाजूंनी चुका झाल्या असतील; ब्रिटिश सरकारचेही सवता सुभा करण्याचे हेतुपुरस्सर धोरण कारणीभूत आहे. परंतु या सर्व लहानमोठ्या कारणांच्या पाठीमागे वरील मानसिक पार्श्वभूमी होती, आणि ही मनोरचना निर्माण व्हायला इतर काही ऐतिहासिक कारणे जरी असली तरी मुसलमानांतून नवीन मध्यम वर्ग बाहेर पडायला उशीर झाला हे एक मुख्य कारण आहे. परकी सत्तेविरुध्द आपला राष्ट्रीय लढा जरी सुरू असला तरी हिंदुस्थानातील अंतर्गत लढा हा मुख्यत: सरंजामशाहीचे अवशेष आणि अर्वाचीन विचार आणि समाजरचना यांच्यातील आहे. हा लढा राष्ट्रीय पातळीवरून चालला आहे. त्याचप्रमाणे त्या त्या समाजातही हिंदू, मुसलमान आणि इतर समाज यांच्यातूनही सुरू आहे. राष्ट्रीय सभा ही राष्ट्रीय चळवळीची मुख्यत: प्रतिनिधी आहे. या नवीन विचारांकडे आणि नवीन समाजरचनेच्या ध्येयाकडे ऐतिहासिक वाढीच्या नियमानुसार ती जात आहे. अर्थात असे करीत असताना जुन्या रचनेच्या पायाशी जितके जुळवून घेऊन पुढे जाता येईल तितके ती करीत असते. या धोरणामुळे एकमेकांशी खूप मतभेद असलेले सर्व प्रकारचे लोक राष्ट्रीय सभेने स्वत:त ओढून घेतले आहेत. हिंदूमध्येही एक अ-संग्राहक अशी चकटबंद समाजव्यवस्था आहे, आणि ती विकासाच्या आड येत आहे एवढेच नव्हे, तर इतर संघांना आणि गटांना तिने भिवविलेही आहे. परंतु ह्या समाजव्यवस्थेच्या खाली सुरुंग लागले आहेत. तिच्यातील गतिहीनता नष्ट होत आहे, आणि काही झाले तरी राष्ट्रीय चळवळीच्या वाढीला ही जुनीपुराणी रचना आता विरोध करू शकणार नाही, थोपवू शकणार नाही. अडचणी आणि अडथळे यांना न जुमानता पुढे जाण्याची शक्ती राष्ट्रीय चळवळीत आता आली आहे. मुसलमान समाजात मात्र अद्यापि सरंजामशाही प्रवृत्तीच्या लोकांचेच प्राबल्य आहे, आणि बहुजन मुसिलम समाजावर त्यांनी आपले नेतृत्व लादले आहे; त्यात त्यांना यशही आले आहे. हिंदू मध्यमवर्ग आणि मुसलमान मध्यमवर्ग यांच्या वाढीत आणि विकासात एकदोन पिढ्यांचे अंतर आहे. आणि हे अंतर राजकीय, आर्थिक आणि इतर शतमार्गांनी दिसून येत असते. मुसलमानांत भीतीची मनोरचना जी निर्माण झाली आहे ती या मागे राहण्यामुळे होय.
परंतु या मागासलेपणावर पाकिस्तान हा काही तोडगा नव्हे. पाकिस्तानचे हिंदुस्थानची फाळणी करण्याचे ध्येय कितीही रुचले तरी तो उपाय नाही. पाकिस्तानमुळे सरंजामशाही वृत्तिप्रवृत्ती अधिकच बलवान होतील, आणि मुसलमानांची आर्थिक प्रगती अडवतील. पाकिस्तानच्या पहिल्या पुरस्कर्त्यांपैकी इक्बाल एक होते. परंतु त्यातील अंतर्भूत धोका आणि बाष्कळपणा त्यांना दिसून आला होता. एडवर्ड थॉम्प्सनचे एकदा इक्बालांजवळ संभाषण झाले होते. त्या संभाषणात ते म्हणाले, ''मुस्लिम लीगचा मी अध्यक्ष होतो आणि पाकिस्तानचे ध्येय मी उद्धोषिले. परंतु हिंदुस्थानचे विशेषत: मुसलमानांचे त्यात नुकसान आहे असे मला आता वाटते.'' एडवर्ड थॉम्प्सनने हा संवाद दिला आहे. शक्य आहे की इक्बालांचे मतपरिवर्तन झाले असेल. पूर्वी पाकिस्तानविषयी तितका खोल विचार त्यांनी केलेलाही नसेल. कारण त्या प्रश्नाने तेवढे मोठे स्वरूप त्या वेळेस घेतलेलेही नव्हते. त्यांची जीवनाकडे पाहण्याची जी सर्वांगीण दृष्टी होती ती पाकिस्तानच्या नंतरच्या वाढलेल्या कल्पनेशी हिंदुस्थानच्या फाळणीशी मुळीच जमत नाही.
अखेर अखेर इक्बाल अधिकाधिक समाजवादाकडे वळले होते. सोव्हिएट रशियाने केलेल्या अवाढव्य प्रगतीमुळे ते आकृष्ट झाले होते. त्याच्या काव्याने सुध्दा निराळे वळण घेतले. मरणशय्येवर पडले असताना मरणापूर्वी थोडे दिवस त्यांनी मला बोलावणे पाठवले. मी ताबडतोब धावून गेलो. मी त्यांच्याजवळ कितीतरी गोष्टींविषयी बोललो. आमचे मतभेद होते, तरी दोघांच्या विचारांत इतके साम्य होते की त्यांच्याबरोबर काम करणे कितीतरी सोपे गेले असते. स्मरन्मनोवृत्तीत ते होते. नाना गोष्टी त्यांना आठवत. मध्येच या विषयावर मध्येच त्या, याप्रमाणे ते बोलत होते. मी ऐकत होतो. मी स्वत: फार थोडे बोललो. इक्बालांविषयी आणि त्यांच्या काव्याविषयी मला फार आदर वाटे, प्रेम वाटे; आणि माझ्याविषयी त्यांचे चांगले मत आहे हे पाहून, त्यांना मी आवडतो हे पाहून, मला कितीतरी आनंद झाला. त्यांचा निरोप घेण्याच्या जरा आधी ते मला म्हणाले, ''जिना आणि तुम्ही, तुम्हांत समान असे काय आहे ? जिना राजकारणी आहेत, मुत्सद्दी आहेत; तुम्ही देशभक्त आहात.'' परंतु जिनांत आणि माझ्यात अजूनही पुष्कळ समान आहे अशी मी आशा राखून आहे. आणि मी देशभक्त आहे यात मोठे ते काय ? या आजच्या काळात-त्या शब्दातील मर्यादित अर्थाने-ते काही मोठे प्रशस्तिपत्र नव्हे. हिंदुस्थानविषयी, भारतभुमीसंबंधी मला कितीही प्रेम वाटत असले तरी पुष्कळ दिवसांपासून मला वाटते आहे की, आपल्या देशातील त्याचप्रमाणे जगातीलही समस्या सोडवायला राष्ट्रीय आसक्तीपेक्षा, केवळ राष्ट्रप्रीतीपेक्षा आणखी अधिक कशाची तरी आवश्यकता आहे. परंतु राजकारणाने जरी मला खेचले असले, मी त्याला बळी पडलो असलो तरी इक्बालांच्या म्हणण्यात सत्य आहे, त्यांचे म्हणणे खरोखर बरोबर आहे की मी फारसा राजकारणी मनुष्य नाही.