कैक वेळी काही एखादे करून त्यात हार खाण्याचा प्रसंग येतोच, पण काही वेळा अशा असतात की त्या वेळी काहीच न करता स्वस्थ बसणे हेच अपयश होऊन बसते. असे असल्यामुळे आम्हाला काही उपक्रम करणे या वेळी प्राप्त होते. आम्हाला काही करावयाचे झाले तर आमच्या नेहमीच्या ठरलेल्या धोरणाप्रमाणे सविनय कायदेभंग हाच एक उपक्रम शक्य होता. परंतु जनतेने कायदेभंग करू नये अशी दक्षता ठेवून केवळ काही निवडक व्यक्तींनी व्यक्तिश: कायदेभंग करावा अशी योजना होती. सत्याग्रह सामुदायिक न करता केवळ वैयक्तिक सत्याग्रह ज्याला म्हणतात तसला हा प्रकार होता. खरे महणजे या विरोधप्रदर्शनाचे स्वरूप नुसते नैतिक होते. राजकारणाच्या दृष्टीने पाहिले तर राज्यकारभारात गोंधळ उडवून देऊन सरकारी अधिकार्यांना चळवळ्या लोकांना तुरुंगात पाठविणे सुलभ करून देण्याचे आम्ही कटाक्षाने टाळावे, हे चमत्कारिक दिसते. कोठल्याही चढाऊ स्वरूपाच्या राजकीय आंदोलनात किंवा क्रांतिमार्गात हा प्रकार आढळत नाही. पण क्रांतिकारक राजकारणात नैतिक उपायांची योजना करावयाची ही गांधींची तर्हा होती, व जेव्हा या तर्हेची चळवळ करण्याचा प्रसंग येईल तेव्हा तिचे नेतृत्व गांधींच्याकडे असावयाचे हे ठरलेलेच होते. ब्रिटिशांचे धोरण आम्ही निमूटपणे चालू देणार नाही, त्या
धोरणावरचा आमचा राग व ते चालू न देण्याचा आमचा निश्चय प्रकट व्हावा म्हणून आम्ही स्वेच्छेने स्वत:वर कष्ट व यातना ओढवून घेणार, पण काही धामधूम करण्याचा आमचा विचार नाही, हे दाखविण्याचा हा गांधींचा मार्ग होता.
हे वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन अगदी अल्प प्रमाणावर सुरू झाले. हा सत्याग्रह करण्याची अनुज्ञा मिळण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीला काही एक प्रकारची परीक्षा द्यावी लागे. ज्यांची ह्या सत्याग्रहाकरिता निवड होई ते एखादा तांत्रिक सरकारी हुकूम मोडीत, मग त्यांना अटक होऊन शिक्षा होई. आमच्या नेहमीच्या प्रघाताप्रमाणे या सत्याग्रहाकरिता निवड प्रथम काँग्रेसमधील वरिष्ठ श्रेणीतल्या मंडळींची- कार्यकारी समितीचे सभासद, प्रांतिक मंत्रिमंडळात पूर्वी मंत्रिपदावर असलेले लोक, कायदेमंडळांचे सभासद व अखिल भारतीय समिती, प्रांतिक समिती यांचे सभासद, या लोकांची-झाली. हे वैयक्तिक सत्याग्रह करणार्यांचे वर्तुळ वाढता वाढता सुमारे पंचवीस ते तीस हजर स्त्री-पुरुष सत्याग्रही तुरुंगात गेले. यातच सरकारने बंद ठेवलेल्या प्रांतिक कायदेमंडळाचे सभासद व अध्यक्ष हेही आले. अशा प्रकारे आम्ही सिध्द करून दाखविले की, लोकांनी निवडून दिलेल्या कायदेमंडळांना काम करू न देता तुम्ही त्यांना बाजूला सारून राज्यकारभार करू लागलात तर तसला एकतंत्री राज्यकारभार निमूटपणे चालू देण्यापेक्षा या कायदेमंडळातल्या सभासदांना व अध्यक्षांना तुरुंग बरा वाटतो.
ज्यांनी तांत्रिक सत्याग्रह करून बंदिवास पत्करला त्यांच्या खेरीजही कैक हजारो लोकांना भाषणे करण्याबद्दल किंवा इतर काही चळवळ चालविल्याबद्दल शिक्षा झाल्या व काही लोकांना चौकशीविनाच पकडून ठेवण्यात आले. अगदी आरंभालाच एक भाषण केल्याच्या गुन्ह्यावरून मला अटक होऊन चार वर्षांची शिक्षा देण्यात आली.
सन १९४० आक्टोबरपासून एक वर्षापेक्षा जास्त कालपावेतो या सार्या लोकांना तुरुंगवास चालूच होता. तुरुंगात असताना जे काही साहित्य मिळेल तेवढ्याच सामग्रीवर लढाई कशी काय चालली आहे, हिंदुस्थानात व इतरत्र जगात काय घडते आहे याची बातमी आम्ही ठेवीत होतो. प्रेसिडेंट रूझवेल्ट यांनी जाहीर केलेली चार स्वातंत्र्ये अटलांटिक चार्टर यांची माहिती आम्हाला वाचायला मिळाली, व नंतर लगेच अटलांटिक चार्टर ही आंतरराष्ट्रीय सनद हिंदुस्थानला लागू नाही हे चर्चिलसाहेबांचे त्या सनदेवरचे वार्तिकही आम्हाला कळले.
१९४१ च्या जूनमध्ये हिटलरने सोव्हिएट रशियावर केलेल्या अचानक हल्ल्याचे वर्तमान कळले तेव्हा आमच्या मनोवृत्ती उचंबळून आल्या व नंतर युध्दाच्या क्षणोक्षणी पालटत गेलेल्या रागरंगाची वार्ता आम्ही मोठ्या चिंतेने व जिज्ञासेने ऐकत होतो.
ता. ४ डिसेंबर १९४१ रोजी आमची काही जणांची सुटका झाली. त्यानंतर तीन दिवसांनी पर्ल हार्बरवरचा हल्ला झाला व प्रशांत (पॅसिफिक) महासागरात युध्दाला आरंभ झाला.