समारोप
हे सारे लिहावयाला मी आरंभ केला तेव्हापासून पाच महिने लोटून गेले आहेत. माझ्या मनात चाललेल्या विचारांचा हा अस्ताव्यस्त पसारा कागदावर मांडताना मी हजार पाने हाताने लिहून काढली आहेत. गेले पाच महिने मी कधी भूतकाळात हिंडलो फिरलो आहे, कधी भविष्यकालात डोकावून पाहिले आहे, तर कधी कधी ''अनादि अनंत अकाल व काल जेथे एकमेकांना छेदतात'' त्या बिंदुमात्रावर कसाबसा तोल सांभाळून स्थिर होण्याचाही मी प्रयत्न केला आहे. ह्या एवढ्या पाच महिन्यांत जगात कितीतरी घडामोडी घाईगर्दीने घडून आल्या आहेत. युध्दाची समाप्ती निदान रणांगणावरील यशापुरते पाहिले तर, लवकरच विजयात होणार असे दिसते आहे. ह्या माझ्या देशात देखील खूपच घडामोडी घडल्या आहेत पण त्या केवळ प्रेक्षक म्हणून मला दुरून पाहाव्या लागल्या आहेत. आणि एकामागून एक अशा दु:खांच्या लाटा मला तात्पुरत्या व्याकुळ करून सोडून माझ्यावरून निघून गेल्या आहेत. विचार करण्याचे व त्या विचारांनी काही आकार आणून ते व्यक्त करण्याचे हे काम माझ्यामागे लागले होते, त्यामुळे कालरूपी पात्याची ही मर्मी घुसणारी वर्तमानकालरूपी तीव्र धार टाळून स्वत:ला त्या धारेपासून अलग ठेवून मी त्याहून मोकळ्या मनाने वावरता येण्यासारख्या भूतकालाच्या व भविष्यकालाच्या विस्तीर्ण क्षेत्रातून वावरलो आहे.
पण हे मन मानेल तिकडे स्वैर भटकणे आता मला सोडले पाहिजे. ते सोडून देण्याला दुसरे कसलेही पुरेसे कारण नसेल तरी प्रत्यक्ष व्यवहारातील एक कारण आहे, अडचण आली आहे ती टाळता येत नाही. मोठ्या प्रयासाने कसे तरी मी मिळविलेले कागद जवळ जवळ संपलेच आहेत, आणि आता आणखी कागद मिळणे कठीण.
हिंदमातेच्या स्वरूपाचा शोध घ्यायला मी निघालो खरा, पण—अखेर काय सापडले आहे मला ? तिचे स्वरूप आज घटकेला काय आहे ते, पूर्वी फार प्राचीन काळी काय होते ते, तिचे अवगुंठन बाजूला सारून मला कळेल ही माझी कल्पना म्हणजे एक व्यर्थ घमेंड होती. आज घटकेला हिंद म्हणजे चाळीस कोटी वेगवेगळ्या स्त्रीपुरुष व्यक्ती, प्रत्येक निरनिराळा, प्रत्येकाचे जीवन म्हणजे त्याच्या विचारांचे व भावनांचे त्याचे त्याचे स्वतंत्र एक विश्व; त्याचा पूर्ण शोध अशक्य. ही जर आजची स्थिती, तर ह्या मानवांच्या एकामागून एक, अनंत पिढ्या आजपर्यंत येथे लोटून गेल्या, त्यांच्या त्या एवढ्या अफाट समुदायातील व्यक्तींचे मनोगत जाणणे त्याहूनही कितीतरी अधिक असाध्य. पण या एवढ्या सार्यांना एकत्र करणारे काहीतरी बंधन होते, अद्यापही ते काहीतरी बंधनामुळे एकत्र आहेतच. भौगोलिक दृष्ट्या, आर्थिक व्यवहार दृष्ट्या हिंदुस्थान हा एक, स्वयंपूर्ण देश आहे, तेथे विविधतेतही एकच सांस्कृतिक एकता आहे, परस्परविरोधी वेगवेगळ्या गोष्टींची एकत्र बांधलेली ही मोट ते दिसत नसले तरी चांगल्या पक्क्या दोर्यांनी घट्ट केलेली आहे. वारंवार परचक्रे येऊन सारा देश परकीयांनी पदाक्रांत केला, पण त्यांना या हिंदमातेचे स्वत्व नष्ट करता आले नाही. तिचे मन जिंकता आले नाही. आणि आज तिचे रूप, आपल्या विजयाचा तोरा मिरवीत असलेल्या एका जेत्याच्या हातातले बाहुले, असे दिसत असले तरी तिची मान त्या जेत्यापुढे लवलेली नाही, ती अजिंक्यच राहिली आहे. त्रिखंड हिंडून धुंडले तरी मूळ हाती लागू न देणार्या एखाद्या प्राचीन लोककथेसारखा, संशोधकाला चकवीत राहण्याचा गुणधर्म तिच्या अंगी आहे, एखाद्या गूढ मंत्राने तिचे मन भरून गेलेले भासते.हिंदमाता म्हणजे एक पुरातन पुराणातली कथा, केवळ कल्पना, एक स्वप्न, कोणा द्रष्ट्याला घडलेला साक्षात्कार, असे वाटते, पण पाहावे तो आपल्यासमोर प्रत्यक्षात ती अगदी खरी उभी आहे, सगळीकडे भरलेली आहे. तिच्याकडे दृष्टी लावली तर तेथे अत्यंत प्राचीन कालातील जगाच्या दूरवरच्या काळोख्या रात्रीकडे अपरंपार पसरत जाणार्या थंड अंधारी वाटा अधूनमधून अंधुक दिसल्या की भीतीने हुडहुडी भरते, पण त्याबरोबरच तिचे दिवस उन्हाने न्हाऊन निघालेले धनधान्यसमृध्दिसंपन्न अभयदायी रूप दृष्टीस पडून मनाला बरे वाटते. आपले खूपसे गतायुष्य नाना घडामोडी करण्यात घालवलेली ही देवी क्वचित काळी आपल्याला लाजिरवाणी, नकोशी वाटते. क्वचित ती उलट्या काळजाची हटवादी महामाया झाली होती असे दिसते, कधी कधी तर तिला वेडाचे झटके आले होते असेही आढळते. पण ही माता मोठी प्रेमळ, वासल्यपूर्ण आहे आणि तिची मुले कोठेही गेली व त्यांच्या ललाट लेखात दैवाने अखेर काहीही विचित्र घटना लिहिलेली असली तरी त्यांना आपल्या आईचा विसर पडणे शक्य नाही. कारण तिची सारी थोरवी तसेच तिचे सारे दोषही अंशरूपाने त्यांच्या पिंडात भिनले आहेत, आणि जीवनातील इतक्या उत्कट भावना, एवढा आनंद, इतका सारा वेडेपणा शतकानुशतके पाहात राहिलेल्या, व ज्ञानवापीत खोलवर दृष्टी पोचवून स्वत:चे रूप पाहून ठेवलेल्या तिच्या डोळ्यांत तिच्या त्या सार्या अपत्यांची प्रतिबिंबे उमटली आहेत. तिच्या त्या अपत्यांपैकी प्रत्येकाला, कोणाला काही कारणामुळे समजून उमजून तर कोणाला काही कारण सांगता येत नसले तरी, तिच्या मायेची ओढ लागली आहे, आणि त्या प्रत्येकाला तिच्या विविध व्यक्तीमत्त्वांपैकी प्रत्येकाला वेगळ्या रूपाचा आविष्कार होत असतो.