धरतीच्या बाळा जो जो रे
निजलें पक्षी सारे धरतीच्या बाळा
झोळी बांधियली झाडाला
छकुल्याला निजायला
जो जो जो जो रे
कोमल चरण तुझें
हुळहुळती रांगुन रांगुन फुटती
होती अति लाल दुखतील
चोळूं कां त्यां तेल ?
जो जो जो जो रे
इवल्या इवल्याशा मुठि लाल
देती बाळ्याला ताल
कुंतल मृदुल अती भुरभुरती
तुझिया भालावरती
जो जो जो जो रे
लावुनि काजळ तिट गाली
झांकिन पदराखालीं
झाल्या तिन्हिसांजा गुणीराजा
झडकरी झोंपीं जा जा
जो जो जो जो रे
जवळी शेतांत तव तात
कष्ट फार करितात
फांद्या आंब्याच्या या वरती
वार्यासंगें डुलती
तारांगण रात्रीं उधळीती
स्वप्न फुलें तुजवरती
जो जो जो जो रे
दिन उदया येतां
कोकिळही गाईल मंजुळ कांहीं
धरती मातेच्या गुणिराजा
तोंवरि झोंपी जा जा
जो जो जो जो रे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.