सोडुन सर्व लागले मीं तुमच्या मागें ।
आतां मजवरी नका भरुं रागे ॥धृ०॥
आयुष्य माझें हें तुमच्या शिरीं चढावें ।
जळतें कामज्वरीं, मज काढावें ।
प्रीतीमध्यें अंतर कधीं न पदावें ।
प्रतिदिवशी, प्रत्यहीं दर्शन मजला घडावें ।
पुरवा गरिबाची आशा हो ! पायिं जडावें ।
वाटे मज अमृतफळ तोडावें ।
व्हा मेहरवान गुणिराया !
केली प्रीत जाइल वाया
घासूनी झिजविली काया
विनवितें समय पाहुनिया रंगरागें ॥१॥
नित उठुन हें काय परोपरीनें उमजाऊं ।
दुबळेपण कोठवरसें समजाऊं ? ।
आपण आकाश, मी जमीन, किती वर पाहूं ? ।
दुरले दूर कशी बापुडी राहूं ? ।
तुम्ही दयामेघ, मी नदी, कोणिकडे जाऊं ? ।
पडतां आवर्षण कैसी वाहूं ? ।
स्नेह करुन मागें का सरतां ?
कसें केलें कर्म विसरतां ?
मी दमलें पदर पसरतां
घट्ट पाय धरितां क्षुधा तृषाचि न लागे ॥२॥
वाढिलें पात्र हें, दुसर्‍यापुढें न जावें ।
रात्रंदिस माझ्याजवळ निजावें ।
अक्षयी देणें राहिलें असें वोजावे ।
घरच्या स्त्रीसमान मज मोजावे ।
टाकितां पिता पुत्रासी कसें त्यजावें ।
मग हो बाळानें कोणीकडे जावें ? ।
मी येवढी तुमची आलकी
सहजागती झाल्या ओळखी
जीव फार करी तळमळ कीं
घडिघडि पलखी, दिस जाती विषयपरागें ॥३॥
ईश्वरापाशीं मागावा पुरुष अशेला ।
येतां जातांना धरिते शेला ।
हें मन चंचळ, आवरावें किती आशेला ? ।
बुडतां येऊन लागले कासेला ।
घ्या लुटा बहर नवतीचा रंग रसेला ।
सख्या, तूं माझ्या प्राणवशेला ।
मुख पसरुन बोलूं कोणासी ?
वाहिले शरिर दानासी
जिव देते आदरमानासी
होनाजी बाळा गुणराशी जनासी सांगे ।
पाहतां ही सुंदरा मजवर रागें ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel