नीरद नील तनु, रूप मनोहर, सगुण मूर्ति साजिरी । विरहत वृजीं परम गोजिरी ॥धृ०॥

शामळ कोमळ कांती अतसी कुसुमोपम चांगली । शिशुरूपें नंदांगणीं रांगली । ज्याला स्तवितां दशशत वदनें शेषाचीं भागलीं । मूर्ती ते गौळ्याघरिं वागली । रडुनी मागतो दहिं दूध लोणी । म्हणे मज भुक लागली । धरुनी वृत्ती बहुत रागेली । धन्य धन्य ते व्रजजन ज्यांची दैवदशा जागली । जे बहु जन्मार्जित मागिली । बाळक्रीडा नाना परि दावी । अपार कीर्ती किती वदावी । दामोदर घे बांधुनी दावीं । लीळा नाटकी हरी । निजजनभवद्विरद संहरी । काळी घोंगडी खांदी शोभे, करीं वेताची छडी । गाई चारित कालिंदी थडी । सिदोरीचें पाठीवरि शिंकें, दधीवोदन आवडी । लवणशाखा नाना परवडी । पेंदा सुदामा वडदवाकुडा वेष्टित गोप गडी । बोली बोलत बहु बोहड  । आर्श मुलें गौळ्यांची ठकवुनी गाई पाठी धांवडी । सिदोर्‍या अवघ्यांच्या सावडी । गाळीप्रदानें गांडु भांडु । मुलें ताडीती म्हणती लबाडु हुतुतु हमामा चेंडूदांडू । खेळत नाना परि । व्रजवनिताला पदरीं धरी ॥२॥

दधी पय नवनीतघृत गौळ्यांघरी खातो करुनी चोरी । त्याला सांगत आपली थोरी । मी ब्रह्माचा बाप कमळा ते आमुची अंतुरी । आपण निजतों शेषावरी । शंखासुर म्यां वधिला पृष्ठीं धरिला मंदरगिरी । धरणी धरिली दाढेवरी । हिरण्यकश्यप दैत्य मारिला होउनि नरकेसरी । वामन तो मी बळीचें द्वारीं । तीन सप्तकें पृथ्वीदान । दिधली वधिला दशानन । तो मी नंदाचा नंदन । भक्तांचा कैवारि । जाणे आहे मथुरापुरी ॥३॥

ह्रद्नत जाणोनियां राधेचें प्रौढपणातें धरी । तियेचे पूर्ण मनोरथ करी । अतिवृद्धा वक्रा कुब्जा ते केली अब्जेपरी । वयासा गुण लावण्यें वरी । उग्रसेना मथुरे स्थापितो कंसाचा अरी । चहूंसांला (?) न कळें थोरी । पांडव पाळक जाला बाळक नंद यशोदे घरीं । उंबरा चढतां टेंका धरी । विश्वाचा जो आत्माराम । पतीत पावन ज्याचें नाम । गोपाळांचें पुरवी काम । नामें जगदोद्धारी । जो गजगणिकेला उद्धरी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel