सख्या, चला बागांत बागांत खेळुं गुलाला ।
तुम्ही रामभक्त, मी स्मरते रामाला ॥धृ०॥
आला राव शिमगा, अहो राव शिमगा, आज होळी ।
करूनीया रंग खेळू खेळीमेळी ।
उठा बसा मेण्यांत मेण्यांत वनमाळी ।
आवड मला मोठी पहाण्याची अशा वेळीं ।
लाल करा पोशाग पोशाग वनमाळी ।
वृज गोकुळची मी गवळण चंद्रावळी ।
बरोबर येते, अहो राव येते, पुढें चाला ॥१॥
आलो लाल बागांत बागांत ऐका जी ।
मांडूं सारीपट, जवळ बसते खुषमौजी ।
जुगूं नका फाशाला फाशाला मोकळा जी ।
हारजीत खेळूं एक डाव चौरसबाजी ।
मात करा मजवरती मजवरती आहे राजी ।
कळे तशा मौजा करा इष्कबाजी ।
मात माझी झाल्यावर पुढें बोला ॥२॥
भर मुठी गुलालाच्या गुलालाच्या फेकीत जी ।
अबिरा बुका लावू, हळू फासा टाकिते जी ।
मागिन जुक अठरांचे अठराचे मागते जी ।
नयन कटयारी राजहंसा रोखितो जी ।
नजर नकों गेंदावर गेंदावर झाकिते जी ।
विडा घेउन लोळा, रंग हिरवा रोहोकिते जी ।
प्रीत ठिवा मजवरती मजवरती, धरिन शेला ॥३॥
मजा झाली डावाजी सारीपाट ।
पुरे करा खेळ, आटपा हो नटबाट ।
नवे नवे दागिने, नवा थाट ।
नवी द्यावीं वस्त्रें, खुप धरली तुमची वाट ।
भरून मारा पिचकारा पिचकारा सुख वाट ।
नक धरूं कवळून, वर लागुन गेली चाट ।
गाठ पडे, ठरवा ठरवा पंचमीला ।
सगनभाऊ गाती संभाळुन सुरताला ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel