अर्धे उरावर पदर नदर तुझी गर गर गर फिरे भवतालीं
ठमकत चमकत चाल चालशी हंसतमुखें नखर्‍याखालीं ॥धृ०॥
शहर पुण्याचे रस्ते हवाशिर, संगिन कामें चिरंबदी ।
सकुमार पाउलें, झडल तुझी बोटावरची रंगमेंदी ।
हळु चाल, हळु चाल, जोडा घाल, गडे गरम जरीचे तिनबुंदी ।
नको नाक नेउं वरते, कळले उषण न सोसे तुज अगदीं ।
वेव्हार झाला बंद, दिसा बुधवारामधी पडली मंदी ।
बिनपैशाविण लोक धावती शहाणेसुरते रणफंदी ।
सदा हस्ती मस्तींत मस्त तशी धुंद होउन बाहेर आली ।
नार नव्हे नागीण मुसाडी मारित जाते मतवाली ॥१॥
गोजिरवाण्या गोर्‍या पोटर्‍या, पातळ नितळ नीट कांडें ।
दाती धरुनिया दोन्ही चालतां रस प्यावा जाउन तोंडे ।
मांडया पडतां दृष्टी चिरांतुन, शरिर होईना मग थंडें ।
तगमग करितां प्राण ठेवावे वाटत बांधुन दोरखंडें ।
चहुकडुन डळमळित झळाळित कोंबडीचे केवळ अंडें ।
चरकीं धरूनिया विधिनें उतरलें सुवर्ण सैसें आज भांडें ।
सर्वांगामधिं व्यंग नसे, कशि नखोनखीं भरली लाली ।
कंबर पाहुन सिंह मस्तकीं येकांतिं बैसुनि धुळ घाली ॥२॥
चंद्रहार पोटावर मिरवे, पदरांतुन मारी लहरा ।
वर मोत्यांचा सुढाळ कंठा, शुभ्र दिसे वर उर सारा ।
कुचजोडी संगीन चेंडू, निवार्‍यास धरला थारा ।
अण्या दोन्ही समसमान लाविल्या, कंचुकींतुन करिती मारा ।
अवळुन कवळुन भोगुं पलंगीं, असा कधीं येइल पहारा ।
शरीर जाते जळुन रुपाचा दृष्टी भरून पहातां तोरा ।
पिवळें दिसतें अंग, पाचवें आजच नहाणें घरिं नहालीं ।
निर्मळ कांती, कोमल काया, ऋणानुबंधें अजि पाहिली ॥३॥
रत्नजडित मणि पेंडी हिर्‍याची, चकचकाट कंठाभवतीं ।
ओठ लाल पवळ्याच्या वेली, मधीं झळकती दंतपंक्ति ।
घोसदार नासाग्र, नथेवर सर्जेच्या शोभा देती ।
कसुन भुवया नैनबाण मारितां चुराडा होय छाती ।
ज्याचे दैवीं असल पलंगीं तोच हिची भोगील नवती ।
काय इतरांचा पाड ! होइल कीं जीवाची सगळ्या माती ।
गंगु हैबती म्हणे खुशालींत भोगी पति रंगित महालीं ।
महादेव कविराज कवीचे छंद रसिक गोडया चाली ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel