स्त्रीचरित्र यापरि श्रवण हें ऐकावें कानीं ।
बहुत नारी घरोघरीं त्यामध्यें विरळा असेल इमानी ॥धृ०॥
सुखसंग्रह तोंवरी मोह माया ममता लाविती ।
जड पडतां किंचित्‌ भावना द्वैताच्या लाविती ।
नाहिं प्रीतिचा लेश, द्रव्य संपादन संपादिती ।
येकाला मोहुनी अणिक मन दुसर्‍यावर ठेविती ।
दाखवून विश्वास, कार्य आपलें तेवढें साधिती ।
मग त्याची ती नव्हे, येकल्या अविचारें नांदती ।
गोड बोलतीं मुखें, परंतु विष भरलें अंतरीं ।
शिर कापुन वाहिलें तरी त्यांना वाटे मस्करी ।
लुटुन घेति सर्वस्व, जणूं का नागविलें तस्करीं ।
अशा रीति वरवरी शोभल्या, नाहिं कळवळा मनीं ॥१॥
आहे कारण तें जंवर तंवर त्याचा आदर असावा ।
पुरतें हातीं लागल्यावरी तो अगदींच वाटे नसावा ।
या विषयाचे पाई नरानें जिव अपला द्यावा ।
दिस गेले ते विसरती, धरती करती उभा दावा ।
क्रियाप्रमाण अनृत्यभाषणी पापाचा ठेवा ।
जगमोहिन्या बायका असा दुसरा नाहीं गोवा ।
सदा राहती घरीं पुरुष, त्यांच्या स्वाधीन राहिले ।
कुलदैवत्य जशा त्या म्हणती मायेनें मोहिले ।
तत्क्षणीं ते सौख्य; नाहीं दुरवर कोणी पाहिलें ।
तप अवघें वाहविलें, भ्रौंशिले नारदादि ऋषिमुनी ॥२॥
किति अर्जविल्या तरी नाहिं मन त्यांचें अपलेकडे ।
निट करतां होईना जसें तें श्वानपुच्छ वाकडें ।
लावितील परिणाम प्रीतिचा हे दुर्लभ ना घडे ।
वाजवितिल शेवटीं जनीं अपकीर्तीचे चवघडे ।
असतां अंतर शुद्ध तिथें मन स्त्रीपुरुषांचें जडे ।
सत्वानें तारितो तिला परमेश्वर मागेंपुढें ।
वरकड सार्‍या वृथा दुरून दिसती केवळ पद्मिणि
पाचहिरकण्या नव्हेत, आहेत खोटे काचेचे मणी ।
निर्धन जाहल्यावरी होतसे त्यांची ममता उणी ।
मग निष्ठुर बोलणीं देति अंतर सर्वत्र निदानीं ॥३॥
तो अपलासा करून कितिक लटक्याच अणा वाहती ।
पैक्याच्या लोभिष्ट कठिण ही धारि (?) देव साहती ।
जो तो येतो घरीं सर्व संधानें त्याचे हतीं ।
टक लावुन त्याकडे लोक हे वर खालीं पाहती ।
चतुरपणें चतुरासी येक्या क्षणामधें मोहिती ।
लागेल तें अनुकूल अशा या बेपर्वा राहती ।
नये भरवसा धरुन कोणती वेळा अणतिल कशी ।
मनचे मनिं समजोन पहावी करुन पुरती चौकशी ।
सत्य संगतीं धरा जसें तें सोनें बावनकशी ।
होनाजी बाळा म्हणे, अशीं लक्षणें पहा शोधुनी ।
चित्ताला आवरून असावें या निर्मल साधनीं ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel