नको नको तुझा संग राजहंसा । जीव जळून गेला, पाहसी तमाशी ॥धृ०॥

करुन थाट वाट पाहत बसलें कीं । रत्न वाळूमधिं कसें गवसलें कीं । इष्कपेच माझे म्याच वळखले कीं । मोट बांधून दर्यांत लोटले कीं । इच्छा भरून आली, नेत्र दाटले कीं । माया नको लावूं इष्क दाटला कीं । माझी दया येईल रूख मी सा (?) ॥१॥

शब्द मारपेच बोललीस साळू । स्नेह होईल हा वेळ नको कंटाळूं । इष्क गंजीफा हातीं नको चाळूं । द्यावी उजवी गुढी होऊन कृपाळू । नखाबोटांवर देह नको जाळूं । घे ग पदरामधिं होउन कृपाळू । वचन देउनिया करी गे खुलासा ॥२॥

असे दाखले सांगतां कुणाला ? । जवळ बैसून मुख लाव रे मुखाला । जीव संकेतें केला हवाला । एक महिना आबोलताच गेला । काय केलें कमी ? सख्या खरें बोला । मी दासी होईन तुमच्या सुखाला । क्रिया द्या हो मला द्या हो दिल भरवसा ॥३॥

आडपडद्याचें बोलणें नसावें । दिवसरात्रीं मजपाशीं असावें । वचन देऊनिया कशास फसवावें ? । आम्ही भोळे, तेथें कपटी नसावें । मिठी मार, द्वैत मनांत नसावें । स्नेह झाल्यावर उभयतां रुसावें । रामा म्हणे, फेक इष्क हातीं फासा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel