(उ) अट्ठकवग्ग :- ह्या वग्गांत सोळा सुत्तें आहेत. ह्याचें, “अर्थकवर्गीय सूत्र” नांवाचें संस्कृत भाषेंतील संस्करणाचे कांहीं खंडित भाग मध्य-आशियांत सांपडले आहेत. एकांत वर दिलेलें नांव सांपडतें. चिनी१ [१. अर्थपदसूत्र (Vishva Bhatati Studies, 13, Shantiniketan, 1951) भाग १-२, ह्या माझ्या पुस्तकाच्या इंग्रजी प्रस्तावनेंत चिनी संस्करणासंबंधीची सविस्तर माहिती मिळेल.] भाषेंतही या ग्रंथाचें संस्करण उपलब्ध असून त्यांत प्रत्येक सूत्राच्या पूर्वी गद्य कथानक घातलेलें आहे. चिनी ग्रंथाचें नांवावरून मूळ नांव ‘अर्थपदसूत्र’ असेंही असावें असें दिसतें. ह्या सोळा सूत्रांपैकीं बहुतेक सूत्रांत शेवटल्या गाथेंत आदर्श मुनीचें वर्णन आहे. कामोपभोगापासून दूर राहावें असें काम (३९), गुहट्ठक (४०), तिस्समेत्तेय्य (४५), व मागन्दिय (४७), ह्या सुत्तांत सांगितलें आहे. सर्व प्रकारचें वाद टाळून, आपली इतर पंथीयांशीं तुलना करून आपण श्रेष्ठ, बरोबरीचे किंवा कनिष्ठ अशी भाषा व्रर्ज्य करून आत्मश्लाघा किंवा परनिंदा सोडून द्यावी-असा विषय दुट्ठट्ठक, सुद्धट्ठक, परमट्ठक (४१-४३), पसूर, मागान्दिय (४६-४७), कलहविवाद (४९), चूलव्यूह, महाव्यूह (५०-५१), अत्तदण्ड (५३), इत्यादि सुत्तांचा आहे. पुराभेद (४८), तुवट्टक, अत्तदण्ड व सारिपुत्त (५२-५४)—ह्या सुत्तांत आदर्श मुनीची चर्या (आचरण) सांगितली आहे. ह्या व पुढील पारायणवग्गांत, “दिट्ठ-सुत-मुत-विञ्ञात,” व शीलव्रतें ह्यांत गुरफटून जाऊं नये असें मोठ्या अट्टाहासानें सांगितलें आहे. उपनिषदांत सांगितल्याप्रमाणें, “आत्मा वा अरे द्रष्टव्य:, श्रोतव्य:, मन्तव्य: निदिध्यासितव्य:” (बृह. २.४.५) असल्या वचनावर विश्वास ठेवणार्‍या लोकांच्या दृष्टं, “श्रुतं, मतं, विज्ञातं” (छा. ६.१३, ६.४.५) असल्या तर्‍हेच्या दृष्टीनें, श्रुतीनें किंवा ज्ञानानें, “मुनि बनत नसतो” (१०७८); अशानें कांहीं शुद्धि प्राप्त होत नाहीं (७९०, ८३९); तेव्हां भिक्षूनें असल्या गोष्टींना किंवा शीलव्रतांना थारा देऊं नये (७९८).

(ऊ) पारायणवग्ग
:- पारायणवग्गांमधील वत्थुगाथेंतील आख्यानामुळें त्या वग्गांतील पुढचीं सोळा सुत्तें एकत्र ओंवली गेलीं आहेत. बावरि नांवाचा एक ब्राह्मण गोदावरी नदीच्या तीरावर यज्ञयाग करीत राहत होता. फार लांबून दुसरा एक ब्राह्मण आला व बावरीला ५०० (निष्क) मागूं लागला. नुकत्याच केलेल्या यज्ञांत बराच खर्च झाल्यामुळें दरिद्री बनलेला बावरि पैसे देण्यास असमर्थ होता. त्यामुळें हा दुसरा ब्राह्मण रागावला व त्यानें त्याला शाप दिला कीं, “तुझ्या डोक्याची सात शकलें होतील.” शाप ऐकून बावरि घाबरून गेला. त्याची एक हितचिंतक देवता होती. तिनें बावरीची अशी खात्री केली कीं, त्या लुच्च्या ब्राह्मणाला डोकें किंवा डोक्याचीं शकलें होणें ह्यासंबंधीं कांहींही ज्ञान नाहीं. तेव्हां त्यानें श्रावस्तीच्या बुद्धाकडे धांव घेऊन आपली शंका फेडून घ्यावी. बावरीनें अजितादि आपल्या सोळा शिष्यांना बुद्धाकडे जाण्यास सांगितलें. शिष्य प्रवासास निघाले. त्यांच्या रस्त्यावरील गावांचीं नांवेंही ह्या ठिकाणीं आपणांस मिळतात व त्यावरून दक्षिणेंतून उत्तरेकडे जाण्याकरितां चालूं असलेल्या दळणवंळणाच्या मार्गाची कल्पना येते. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार्‍या मार्गावरचीं ठिकाणें दिलीं आहेत तीं क्रमानें अशीं-प्रतिष्ठान (पैठण), माहिष्मती, उज्जयिनी, गोनद्ध, विदिशा, वनसव्हय, कौशांबी, साकेत, श्रावस्ति; व तेथून पुढें सेतव्य, कपिलवस्तु, कुशिनगर (कुसिनारा), पावा व राजगृह. येथें राजगृहांत गौतम बुद्ध श्रावस्तीहून आलेला होता. ह्या शिष्यांना जवळ येतांना पाहून त्यांच्या मनांतील शंका बुद्धानें आपल्या दिव्य चक्षूनें ओळखल्या व त्यांचें शंकानिरसन केलें. “अविद्या हें मस्तक आहे व श्रद्धा, स्मृति, समाधि, छन्द व वीर्य यांनीं युक्त अशी जेव्हां विद्या असते तेव्हां ती मस्तकाचीं शकलें करणारी (मुद्धातिपातिनी) बनते.” बुद्धाची ही दिव्य दृष्टि व दिव्य ज्ञान पाहून शिष्य खूष झाले व त्यांनीं आपल्या गुरूच्या वतीनें साष्टांग प्रणिपात केला. बुद्धानें बावरीबद्दल व शिष्याबद्दल सदिच्छा प्रकट केली व “तुमच्या इतर कांहीं शंका असल्यास त्यांचें निरसन करूं” असें आश्वासन दिलें. मग सोळाहि शिष्यांनीं पाळीपाळीनें बुद्धाला प्रश्न केले व बुद्धानें त्यांचीं उत्तरें दिलीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel