“रामराव हा व्यवहार आहे. तुम्ही जे पैसे नेणार त्याची फेड होणें शक्य आहे का? तुम्हांला तरी तसे वाटतें का? तुमच्याजवळ कांहींहि उरलेलें नाहीं असें तुम्हीच म्हणतां. तुम्हांला फुकट देण्याइतका मी उदार नाहीं.”
रामराव पैसे घेऊन गेले. गुणाची त्यांनीं जरा थाटानें मुंज केली. गुणा मोठा होऊं लागला. तो इंग्रजी शाळेंत जाऊ लागला. तो हुशार होता. मुलगा पुढें नाव काढील असें सारे म्हणत. परंतु रामरावांना वाईट वाटे. आपल्या मुलाला शिकवण्याला त्यांच्याजवळ पैसे कोठें होते? तुमच्या गुणाला खूप शिकावा. तो हुशार आहे. असें कोणीं म्हटलें म्हणजे त्यांना वाईट वाटे. ते म्हणत, “नसता हुशार तर बरे झालें असतें. त्याची हुशारी वायां जाणार. त्याची बुद्धि फुकट जाणार. दरिद्री व कर्जबाजारी पित्याच्या पोटीं कशाला आला?”
“तो शिष्यवृत्ति मिळवील व अभ्यास करील. तुम्हांला काळजी नको.” लोक म्हणत.
“परंतु आपणांस मदत करतां येत नाहीं याचें वाईट वाटणारच मला.” रामराव दु:खाने उत्तर देत.