शेतक-यांत दिवसेंदिवस असंतोष माजत होता. सरकार व सावकार यांचे अन्याय अत:पर सहन करावयाचे नाहींत असें शेतकरी म्हणूं लागले. गांवोगाव किसानांचे संघ स्थापन होऊं लागले. शेतकरी संघटना करूं लागले. शेतकरी कवायती करूं लागले. खेडोपाडीं त्यांचीं पथकें तयार होऊं लागलीं. ‘उठाव झेंडा बंडाचा’ हें गाणें सर्वत्र घुमूं लागलें. निर्भयता येऊं लागलीं. बकासुर दूर करावयास बलभीम उभा राहूं लागला.
त्या वर्षी अपरंपार पाऊस पडला. चांगलें येणारें पीक वाहून गेलें. नद्यांना अपरंपार पूर आले. ते पूर शेताभातावर पसरले. कांहीं कांहीं शेतांतून चार चार हात वाळू येऊन पसरली. शेतें फुकट गेलीं. सर्वत्र निराशा पसरली.
परंतु सरकार व सावकार यांना दयामाया नव्हती. तरीहि आणेवारी सहा आण्यांच्या वरच! पूर येण्यापूर्वी आणेवारी झाली होती. मागून पूर आले. शेतांतील पीक वाहून गेलें. परंतु कागदावरचें लिहिलेलें सुरक्षित होतें. तें कोण पुसून काढणार? गरिबांचे अश्रु त्याला पुसून टाकूं शकत नाहींत.
दयाराम भारती गांवोगांव सभा घेत होते. एक पैहि तहशील भरूं नका, सावकाराला कांहीं देऊं नका, आणि जप्ती आली तर सारे विरोध करायला उभे रहा असें ते सांगूं लागले. शेतकरी निश्चय करूं लागले. सरकारी तगादे सुरू झाले. पैशासाठीं छळ सुकू झाले. पाटलांना ताकिदी झाल्या कीं आधीं तुम्ही तहशील भरा. तुम्ही उदाहरण घालून द्या, म्हणजे मग इतरहि भरतील. परंतु पाटील तरी कोठून भरणार?
“रावसाहेब, मी कोठून भरूं तहशील?” एक पाटील अधिका-यांस म्हणाला.
“गुरेंढोंरें विका. बायको विका.” अधिका-यानें उत्तर दिलें.
गरिबाला अब्रू ही वस्तु नाहीं. गरिबाची बायको, गरिबांचीं मुलें म्हणजे कचरा. बाजारांतील भाजी. पाटील कांहीं बोलला नाहीं. दीडशें वर्षांच्या गुलामगिरीनें सारे अपमान गिळायला राष्ट्र शिकलें होतें आणि खरेंच त्या पाटलानें आपलीं गुरेंढोरें विकलीं. गुरें विकूनहि तहशील पुरा करायचें? शेवटीं दुस-या एका सावकारानें शंभराचे दोनशें लिहून घेऊन हातीं ७५ ठेवले. पाटलानें शेतसारा भरला.
आणि पाटील व तलाठी आतां उठलें. शेतक-यांस छळूं लागले. एका गांवीं एक शेतकरी होता. त्याच्याजवळ खरोखरच कांहीं नव्हतें. तो कांहीं देईना. एकदां तो आठवड्याच्या बाजाराला एरंडोलला आला होता. तो रुपयाचें घान्य विकत घेत होता. तों त्याच्या गांवचा चलाठी तेथें उभा.