“का रे गुणा, अलीकडे तूं सकाळी येत नाहीस?”
“मी सायंकाळी येत जाईन. परंतु सकाळी नको. सकाळीं वेळ होत नाहीं.”
“पूर्वी वेळ होत असे. आतां कां होत नाहीं? तुझें प्रेम कमी झालें. पूर्वी माझ्यावांचून तुला चैन पडत नसे. परंतु अलीकडे तूं जरा दुरावत चाललास, महाग होत चाललास.”
“जगन्नाथ, आपण दोघे मित्र होणें बरें नाहीं. मी गरीब, तूं श्रीमंत. गरीबानें श्रीमंताचा मित्र होणें बरें नाहीं. लोक त्यांत नाना अर्थ पाहतात. त्या मैत्रीमध्ये मिंधेपणाचा वास जगाला येतो. श्रीमंत मित्रापासून फायदा आहे, म्हणून हा गरीब त्याच्याकडे जातो असें लोक म्हणतात.”
“गुणा, आजच हे विचार तुझ्या मनांत कोठून आले? माझें का कांहीं चुकलें? माझे कांहीं चुकलें? मला कांहीं मिळालें तर तुझ्यासाठीं मी ठेंवतों. माझ्या घरीं का तुला कोणी बोललें? खरें सांग.”
“कांय सांगूं?”
“तुझ्या मनांतील दु:ख सांग.”
गुणानें त्या दिवशींची ती हकीकत सांगितली. जगन्नाथचे डोळे भरून आले. तो म्हणाला, “आजपासून मीहि घरीं दूध घेणार नाहीं. माझ्या मित्राला जर माझ्या घरीं दूध मिळत नसेल तर मी कशाला घेऊं?” परंतु गुणाला हा निश्चय ऐकून अधिकच वाईट वाटलें. तूं असें करूं नकोस, म्हणून त्यानें परोपरीनें सांगितले.
खरोखरीच जगन्नाथ घरीं दूध घेतनासा झाला. त्याची आई त्याला आग्रह करी. तो नको म्हणे.
“अरे पण कां घेत नाहींस दूध? तुला बरें का वाटत नाहीं? तुला का काहीं होतें?” आईनें विचारले.
“मला कांहीं होत नाहीं.”
“मग हे घे दूध.”
“नको, खरेंच नको.”