वर्ग बंद झाला. थोडेफार त्या बायांजवळ बोलून कावेरी निघाली. नंतर ते पुरुष उभे होते तेथे ती गेली.
“तुझा कसा रे आहे मुलगा?”
“बरं वाटतं आतां त्याच्या जिवाला.”
“आणि तुझ्या मुलाचे पत्र आले रे?”
“पत्र आले. संप संपला. पुन्हा कामावर जाऊ लागले.”
“बरे झालें.”
“पगारवाढ मिळाली थोडी.”
“थोडी तर थोडी. पुढे सारे स्वराज्य श्रमणा-यांचे करूं. भविष्य राज्य तुम्हारा माने.”
“होईल तेव्हा खरे आई.”
“होईल. होईल. तुम्ही सारे भाई बना म्हणजे होईल.” आणि आकाशांत गडगडाट झाला.
“ऐकलात आवाज? काही चिन्ह नव्हते. परंतु हालचाली होत होत्या. वारे हळूहळू वहात होते आणि त्या लक्षांत न येणा-या हालचालींतून ही प्रचंड हालचाल सुरू झाली. गडगडाट व्हायला लागला. पाऊस येईल. केरकचरा वाहून जाईल. मोठा पूर आला म्हणजे जागचे न हालणारे गोटेहि हालतात. दगडहि पुढे जातात. तसे होईल. क्रांति होईल. हालचाली होत आहेत. आज दिसत नाहीत. पोटांत आहेत, ओठांत आहेत. उद्यां हातांत येतील आणि येईल मोठा पूर. सारा जुलूम वाहून जाईल. नवीन समाज येईल. मग नवीन शेती, नवीन पीक. सर्वांच्या सुखाचे पीक. खरं ना?”
“होय आई.”
“जा आतां तुम्ही. भिजाल.” मुली म्हणाल्या.
“भिजू दे. या पाहुण्यांना मद्रासी पावसांत भिजू दे.”