जगन्नाथच्या डोक्यावर कावेरीने छत्री धरली होती.
“द्या आता मी धरतो.”
“आपण दोघे धरू म्हणजे झालं!”
आणि ती छत्री दोघांनी धरली. परंतु रक्षण कोणाचेच होत नव्हते.
“आपण दोघं भिजत आहोत.” जगन्नाथ म्हणाला.
“देवाघरचा प्रेमाचा पाऊस!” ती म्हणाली.
“परंतु गारठून जाऊं.” तो म्हणाला.
“भरपूर पांघरूण घ्या म्हणजे ऊब येईल.” आणि घर आले.
“भिजलीस ना?” पित्याने प्रेमळपणे विचारले.
“या छत्रीने थोडा सांभाळ केला.” ती म्हणाली.
जगन्नाथ वर आपल्या खोलीत गेला. त्याने कपडे काढले. दुसरे कपडे त्याने घातले. पाऊस आता चांगलाच पडू लागला. गच्चीच्या दारांत तो उभा राहिला. शेवटी अंथरुणावर पडला. तो झोपी गेला.
जगन्नाथ हिंदीचा अभ्यास करू लागला. हिंदी मासिके वाचू लागला. त्याला अर्थात् ते सारे सोपे जाई. हिंदीचे व्याकरण तो शिकला. त्याने चांगल्या रीतीने पास होण्याचे ठरविले. तो तेथील अभ्यासमंडळांनाहि जाऊ लागला. कधी कधी इंग्रजीत व्याख्याने असत. त्या दिवशी तो जाई. तो हिंदींतून स्वत:चे विचारहि मांडी. त्याचे नवीन नवीन मित्र झाले.
“तुम्ही हिंदीच्या परीक्षेत पहिले या.” कावेरी म्हणाली.