पंढरीशेटजींची शेती सर्व एरंडोल तालुक्यांत पसरली होती. शेजारच्या अमळनेर तालुक्यांतहि शिरली होती. जिकडे जाल तिकडे त्यांची शेती, त्यांची जमीन. एरंडोल तालुक्यांत प्राचीन काळीं तो बकासुर झाला. तो सर्वांना छळी. सर्वांना गिळी. बकासुर एकदांच नाहीं झाला. सर्व काळीं असे बकासुर आहेत. हिंदुस्थानांत आहेत, जगभर आहेत. शेतक-यांची शेती गिळंकृत करणारे बकासुर! हा गांव म्हणे अमुक शेटचा, हा गांव तमुक शेटचा! शेटजी गादीवर लोळत असतो. त्याची जमीन कशी? परंतु असाच उलटा न्याय आहे. ज्याचा घाम शेतांत पडतो, त्याची जमीन कधीं बरें होईल?

शेतक-यांची शेतेंच नाहीं तर घरेंदारेंहि पंठरीशेटजींच्या हातीं आलीं. शेतकरी शहरांत निघून गेले. घरेंदारें सोडून मजूर होऊन निघून गेले. तीं त्यांचीं घरें तशींच दीनवाणीं सुसकारे सोडीत होतीं. त्या घरांना कुलपें होतीं. त्यांत आतां उंदीर नाचत खेळत. घुशी वस्ती करीत.

कोणत्याहि खेड्यांत जा. पंढरीशेटजींस कोणी बरें म्हणत नसे. परंतु त्यांच्यापेक्षांहि त्यांचे दोन वडील मुलगे अधिकच पिळणूक करणारे निघाले. बापसे बेटा सवाई. पंढरीशेट आतां वयस्क झाले होते. दोघे वडील मुलगे कारभार पहात होते. या वडील मुलांच्या तोंडीं मृदु शब्द कसा तो कधीं नसे. पैशाचा धूर त्यांच्या डोळ्यांवर चढला होता. त्यांचें सारें लक्ष एका गोष्टीवर असे. कधीं कोणाच्या शेताचें लिलांव करतां येईल, कधीं कोणाचें घर घेतां येईल. हेंच त्यांना वेड. बगळा माशावर टपलेला त्याप्रमाणें हे शेतक-यांच्या जमिनीवर टपलेले.

त्यांच्या घरीं नेहमीं दीनवाणे शेतकरी बसलेले असावयाचे. दया करा, पोरांबाळांना राहूं दे थोडी जमीन, नका त्यांना देशोधडीला लावूं, असें डोळ्यांत पाणी आणून विनवावयाचे. परंतु त्या सावकारी पाषाणांस पाझर फुटत नसे. मोठमोठ्या जमाखर्चाच्या वह्या घेऊन बसलेले कारभारी हंसत. डोळ्यांची आरशी वर करून डोळे मिचकावीत.

पेटीजवळ बसणारा मुख्य दिवाणजी फारच दुष्ट होता. पेटीजवळ बसून लोडाजवळ बसून, त्याचें पोट लोडासारखें झालें होतें. त्याला जमाखर्चाची वही लिहायला दुसरें कांहीं लागत नसे. पोटावर वही ठेवून तो लिही. पोटच जणुं टेबल. पोटच जणुं डेस्क! त्याच्या त्या अगडबंब पोटांत माया नव्हती. प्रेम नव्हतें! केवळ दुष्टपणा भरलेला होता. हिशोबाचे कामांत त्याच्यासारखा हुषार माणूस नसेल असें म्हणत. त्या दिवशीं रविवार होता. जगन्नाथ घरींच होता. खालीं बैठकीच्या खोलींत दोन शेतकरी येऊन बसले होते. दिवाणजी व इतर कारभारी हिशोब करीत होते. शेतकरी दाराजवळ बसले होते. वहाणा जोडे ठेवतात त्या ठिकाणीं.

“तुमच्याकडे नऊशें रुपये निघतात.”

“नऊशें कसे निघतील? कपाशीच्या गाड्या धरल्यात का? आणि एकदां पन्नास दिले होते ते?”


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel