“येऊ. आम्ही इंदूरला येऊ.”
“इंदूर किं दूरम्?” रामराव म्हणाले.
“होय. इंदूर दूर नाही. ते आता तुमच्याजवळ आहे.” तो सदगृहस्थ म्हणाला.
आणि मनमाड स्टेशन आले. त्यांनी फराळ केले. त्या सदगृहस्थांनी केळी वगैरे घेतली. गुणाला आग्रह करून करून त्यांनी दिली. त्याला कढत दूध त्यांनी दिले. रामराव व गुणाची आई यांनी चहा घेतला. जणु ती सारी एका कुटुंबांतील झाली.
गाडी निघाली. गुणाने पुन्हा एक राग आळवला. सारे तटस्थ झाले. शांत झाले.
“जरा पडा आता.” तो गृहस्थ म्हणाला.
आणि गुणा झोपला. त्या गृहस्थाच्या उशीवर डोके ठेवून झोपला. जगन्नाथकडे तो असाच झोपत असे. त्याला झोप लागली. दु:खी मन झोपले. रामराव व ते सदगृहस्थ बोलत होते.
“तुमचा मुलगा म्हणजे एक देवाची देणगी आहे तुम्हांला. कसे गोड बोलतो, गोड वाजवतो! किती भावनाप्रधान, उदार मन, कशी गरिबांबद्दल विचार करणारी बुद्धि! आणि भावनोत्कट होऊन बोलू लागला म्हणजे तोंड कसे लाल होत जाते. खरेच देवाने तुम्हांला मोठी देणगी दिली आहे.”
“परन्तु याच्या भावनाप्रधान मुलांची भीतिहि वाटते. जातील तेथे जातील.”
“परन्तु याच्या सद्भावना आहेत. त्या त्याला तारतील.”
“देवाला दया. सारे शेवटी त्याच्या हाती. तुमची आमची त्यानेच गाठ घातली. कोठे होती कल्पना! आम्ही खरोखर कोठे चाललो होतो, दु:खाने वेडी होऊन चाललो होतो; परन्तु तुम्ही भेटलेत. गुणा म्हणाला ते खरे, की तुम्ही देव भेटलेत.”
“आणि तुमच्या मुलाच्या रूपाने मलाहि जणुं देव भेटला.”