“कधीं येईल, कधीं येईल
जीवनाचा राजा माझा जगन्नाथ कधीं येईल”

असे गाणे, असे चरण इंदिरा म्हणत होती. “येईल येईल, धीर धर सखि; तुझा नाश सुखी येईल, येईल!” असे इंदु म्हणत होती.

आणि दोघे उभे राहिले. चंद्रसूर्यासारखे उभे राहिले. आकाशांतून उतरलेल्या ता-यांप्रमाणे उभे राहिले.

“इंदिराताई!” गुणाने हांक मारली.

दोघी चमकल्या. एकदम उभ्या राहिल्या.

“इंदिराताई, चुकलेला जगन्नाथ मी शोधून आणला आहे. त्याला तुमच्या स्वाधीन करीत आहे. सांभाळा आतं त्याला. इंदु, चल आपण जाऊं.” असे म्हणून गुणाने जगन्नाथला इंदिरेच्या स्वाधीन केले व तो नि इंदु जिना उतरून निघून गेली.

इंदिरा खाली बसली. जगन्नाथचे डोके मांडीवर घेऊन बसली. त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वहात होत्या. तिचेहि डोळे स्रवत होते. ती पतीला जणुं स्नान घालीत होती. त्याला शुद्ध करून घेत होती.

“इंदिरे, मी पापी आहे. मला मरूं दे. तोंड वर करून तुझ्याकडे बघवतहि नाही. मांडीवर खाली तोंड करूनच मरूं दे, मरूं दे.”

“शांत व्हा हो. पत्नीला पति कधी पापी नाही दिसत. आईला मूल कधी अमंगल नाही दिसत. पडा हो.”

“इंदिरे, मी मोहांत पडलो. तुला विसरलो. अरेरे! माझ्या मनांतील वेदना कशा सहन करूं?”

“माझ्या मांडीवर झोपा. सा-या जखमा भरून येतील. वेदना थांबतील. नका हो रडूं. नको आता डोळ्यांत पाणी. जगांत कोण नाही मोहांत पडत? सारे पडतात, पुन्हा वर चढतात. तुम्ही कसेहि असा, तुम्ही माझे आहांत. मला गोड आहांत. माझे होतेत म्हणून ना पुन्हा माझ्याकडे आलेत? खरे की नाही?”

“”तुझ्याजवळ शुद्ध व्हायला आलो. चंद्रभागेत उडी टाकून शुद्ध होणार होतो; परंतु तीहि जणुं मला शुद्ध न करती. तिलाहि का मी काळाकुट्ट दिसलो असतो? तुझ्या डोळ्यांतील चंद्रभागेजवळ आलो. इंदिरे, मला शुद्ध कर, मला शुद्ध कर.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel