कराल ना सारे प्रेम? घ्याल ना हरिजनाला जवळ? आणाल ना खरा धर्म? माणुसकीचा, प्रेमाचा, देवाला आवडणारा खरा धर्म आणणार असाल तर करा सारे वर हात!”
नाट्यप्रवेशांतील ती आज्ञा ऐकतांच सा-या प्रेक्षक स्त्रीपुरुषांचे हात वर होतात. महात्मा गांधी की जय गर्जना होते. शेतक-यांच्या प्रवेशाचे वेळेसहि “हे अन्याय दूर व्हायला हवे असतील तर गावोगाव किसान सेध हवेत. किसान स्वयंसेवक हवेत. कराल ना असे किसान संघ स्थापन? करणार असाल तर हात वर करा.” असे म्हणताच हजारो हात वर होतात. इन्किलाबाची गर्जना होते. किसान कामगार राज्याचा जय असो असे घोष दुमदुमतात.
मधूनमधून मोटेचा आवाज, पक्ष्यांचे आवाज, गाढवाचा आवाज – अशा नकला करतात. मध्येंच एखादा पोवाडा म्हणतात. मध्येच टिप-यांचा खेळ. आणि ते मग गंभीर प्रवेश. अशा रीतीने विनोद व गांभीर्य यांचे मिश्रण ती मुले करतात व सारे प्रेक्षक तल्लीन होतात. सारी यात्रा या मुलांसमोर जमते. आणि शेवटी त्यांचा नायक, तो व्यवस्थापक येऊन म्हणतो, “आमच्याजवळ असे दुसरेहि प्रवेश आहेत. आम्ही या सुटीत सर्वत्र हिंडू इच्छितो. ज्याला आम्हांला बोलवायचे असेल त्याने कळवावे. निरनिराळ्या गावी येऊन हे खेळ आम्ही करून दाखवू. तुमच्यांत जागृति व्हावी हा हेतु. तुम्हा तमाशे बोलावता. आता आम्हाला बोलावीत जा. तमाशाला जे देता ते आम्हाला द्या. आम्हांला जे काही दिलेत तर ते किसान कामगार चळवळीलाच सारे देण्यात येईल. दयाराम भारतींसारखे तळमळीचे कार्यकर्ते देशात कामे करीत आहेत. त्यांना कोण करणार मदत? पत्रके काढायची, प्रवास, रोजचें निदान एक वेळचे जेवण. याला नको का थेडा पैसा? जर तुम्ही आम्हाला थोडे दिलेत, तर तो आम्ही देऊं. तुम्हीहि गरीब आहांत. परंतु तुमच्याजवळ पुन्हा मागायचे. गरीब असलो तरी शेतात दाणे पेरतो. हेतु हा की, पुढे भरपूर पीक यावे. त्याचप्रमाणे गरीब असलेत तरी मेळा बोलावून थोडी मदत द्या. ती मदत पुढे तुमचे संसार सुंदर करील. किसान कामगार चळवळ वाढेल. खरे स्वराज्य येईल.”
मुलांचा हा प्रयोग कल्पनेच्या बाहेर यशस्वी झाला. यात्रेंत गावोगावचे लोक आले होते. त्यंनी या मेळ्याची वार्ता आपआपल्या गावी नेली. आणि खरोखरच मेळ्याला आमंत्रणे येऊ लागली. आज हा गाव, उद्या तो गाव. मुलें उत्साही होती. दिवसां गाव स्वच्छ करीत.
स्वच्छ करूं स्वच्छ करूं
हा गाव आपुला स्वच्छ करूं।।
रोगराइ ती दवडूं दूर
आरोग्याला आणूं पूर
आनंदानें गांव भरूं ।।हा गांव.।।
जाळुन टाकूं सारी घाण
घाणीजवळी न टिके प्राण
सगळीकडची घाण हरूं ।।हा गांव.।।