“गाणारे म्हणजे सुस्त. त्यांच्या हातवा-यांची व तोंडाची गति मात्र पाहून घ्या. चार चार तास ओरडतात, परंतु गळा बसत नाही आणि हातांनी आळेपिळे देत असतात, परंतु हात थकत नाहींत.”
“मी कोठे हात नाचवतो गातांना?”
“तुम्ही हातवारे जोपर्यंत करीत नाही तोपर्यंत शास्त्रीय गाणे तुम्हांला आले असे कोणी म्हणणार नाही. पशुपक्ष्यांच्या सर्व आकृति आपल्या शरीराच्या करून दाखवल्या पाहिजेत. जणुं सृष्टींतील सर्व प्राणिमात्रांचे आवाज एकत्र करून दाखवल्या त्यांतून एक महान् मधुर संगीत निर्मायचे असते.”
“ही कसली झाडे? फार छान दिसतात.”
“यांना पुन्नाग म्हणतात. फुले पहा कशी नागासारखी आहेत.”
“झाडांवर कसे त्याचे घोसच्या घोस आहेत. जणुं कानांत दागिने घालूनच उभी आहेत झाडे. फार छान!”
“आणि ती शिरीषाची झाडे हो. पहा कशी फुले आहेत! देवाच्या मस्तकावरची जणुं छत्री. किती सुकुमार फूल!”
“तुमच्याकडे फुलझाडे पुष्कळ.”
“महाराष्ट्रांत नाहीत का?”
“आहेत, परंतु इतकी नाहीत. पुन्नाग तर नाहीतच. आमच्याकडे याला कोणी कॉर्क ट्री म्हणतात. विलायती झाड, बुचाचे झाड, असे म्हणतात.”
“जे माहीत नाही ते विलायती. स्वत:च्या देशांतील वस्तूंनाहि आपण विलायती मानू लागलो. स्वत:च्या देशांतील फुलांफळांना विदेशी मानू लागलो.”
“माणसेहि जेथे एकमेकांना विदेशी मानतात तेथे फुलांफळांची गोष्ट काय? हा मद्रासी, हा महाराष्ट्रीय, हा बंगाली, हा बिहारी. आमच्याकडे गुजराती, मराठी, कानडी—सारे कलहप्रकार आहेत.”
“आणि आमच्याकडेहि. आंध्र व तामीळी यांच्यांत कोण स्पर्धा! मागे पट्टाभि सीतारामांना ते केवळ आंध्र आहेत म्हणून तामीळी लोकांनी मते दिली नाहीत. आणि आंध्र प्रांतातील पुष्कळ समाजवाद्यांनीहि आयत्या वेळेस तत्त्वज्ञान बाजूस ठेवून आपल्या प्रांतांतील अध्यक्ष होत आहे ना, द्या मते; म्हणून त्यांना दिली. केवळ तत्त्वाचे उपासक असे आपण कधी बरे होऊ? ही बाहेरचीं बंधने कधी झुगारूं?”