“आई तसे म्हणाली एक दिवस.”
“मला तूंच म्हणत जा.”
“बरे. म्हणेन हो. दोघेच फक्त असूं तेव्हा म्हणेन. आईबाबांसमोर तुम्ही म्हणेन.”
“तुलाहि मी तुम्ही म्हणूं?”
“काही तरीच. पुरुषांचा मान मोठा हो!”
“आणि स्त्रियांवर पुरुषांचे फार प्रेम असतें हो. जेथे प्रेम असते तेथे आपण एकेरी हाक मारतो.”
“म्हणजे स्त्रियांचे प्रेम पुरुषांवर नसते वाटते?”
“प्रेमापेक्षां भक्ती जास्त असेल.”
“गुणा, प्रेम थोर की भक्ती थोर?”
“दोन्ही एकरूपच आहेत.”
गुणा कलकत्त्यास निघून गेला. तिकडे नीट अभ्यास करू लागला. महाराष्ट्र मंडळानें त्याची व्यवस्था लावून दिली. तेथील महाराष्ट्र मंडळांत गुणा लोकप्रिय झाला. महाराष्ट्र मंडळाची स्वत:ची इमारत नव्हती. ती इमारत बांधावयाची होती. दरवर्षी वर्गणीरूपाने पैसे गोळा करून फंड साठवण्यांत येत होता. महाराष्ट्र मंडळाच्या वतीने एक नाटक करण्यांत येणार होते. एक बंगाली नाटक कंपनी त्या खेळाचे उत्पन्न महाराष्ट्र मंडळाच्या फंडासाठी देणार होती. त्या खेळांत मधल्या वेळांत गुणाचें सारंगीवादन ठेवण्यांत आले.
थिएटर भरून गेले होते. तिकिटे खूप खपविण्यांत आलीं होती. काही लोक केवळ सारंगी ऐकण्यासाठी आले होते. गुणाने सारंगी वाजविली. अर्धा तास वाजविली. त्याने बंद केली. लोक म्हणू लागले. सारंगीच सुरू ठेवा. पुन्हां पंधरा मिनिटे त्याने वाजविली. सारे नाटकगृह तन्मय झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला.
गुणीची कीर्ति पसरली. एके दिवशी सायंकाळी महाराष्ट्र मंडळाच्या जागेत एक बंगाली गृहस्थ आले.