“तूं येशील माझ्याबरोबर? गुणा, कधीं कधीं वाटतें कीं गरीब व्हावें. भिकारी व्हावें. हिंदुस्थानचे यात्रेकरू व्हावें. बैरागी असतात. सारा हिंदुस्थान त्यांनीं पाहिलेला असतो. त्यांचे अपमान होतात. आगगाडींतून त्यांना खालीं उतरवितात. परंतु शांतपणें ते हिंडतात. हिंदुस्थानच्या यात्रा करतात. मातृभूमीचें आसेतुहिमाचल दर्शन घेतात. येशील तूं? आपण भिकारी बनूं. तूं सारंगी वाजव, मी गाणीं म्हणेन. नवीन देशभक्तींची गाणीं; बंधुभावाचीं गाणीं; ख-या धर्माचीं गाणीं; गरिबांचीं गाणीं; मजा येईल. भारतीय संसार पाहूं.”

“पूर्वी आपल्या देशांत भिका-यांनींच विचारप्रसार केला. फकिरांनीं धर्मप्रसार केला. हिंदी भिकारी चार दाणे मागतात परंतु विचारांचे दाणे भीक घालणा-याला देतात. शरीराची भाकर मागून ते विचाराची भाकर देतात. भिका-यांचे हिंदुस्थानवर अपार उपकार आहेत. त्यांनीं सारी भारतीय संस्कृति एकरूप केली. तुकारामांचे अभंग, मनाचे श्लोक, कबीराचे दोहरे, मीराबाईंचीं पदें, गोपीचंदाचीं गाणीं हिंदुस्थानभर कोणीं नेलीं? हें विचारैक्य कोणीं निर्मिलें? जेव्हां वर्तमानपत्रें नव्हतीं, छापखाने नव्हते, अशा काळांत भिकारी हीं संकृतिप्रचाराचीं जिवंत साधनें होतीं.”

“पहाटे येणारे वासुदेव भूगोल शिकवीत; पोवाडे म्हणणारे शाहीर इतिहास शिकवीत. हे सारे लोक केवळ फुकट खाणारे नव्हते. भिक्षा हा जणुं त्यांचा धंदा. भिक्षा मागत व ज्ञान देत. जगन्नाथ, आपण का असेंच व्हावयाचें? नवीन विचारांचा प्रसार करणारे?”

“हो गुणा, असे भिकारी होऊं. नवराष्ट्रधर्म फैलावूं. फकिरांनीं हिंदुस्थानभर मुसलमानी धर्म फैलावला. आपण नवराष्ट्रधर्माचे नवीन फकीर. खरेंच व्हायचें का असे फकीर? मी राष्ट्रीय गाणीं शिकेन. दयाराम भारतींजवळून खूपशीं गाणीं उतरून घेऊं. जेथें जाऊं तेथें आपल्याभोंवतीं लोक गोळा होतील. अरे आपण येथें गात वाजवीत बसलों तर रस्त्यावर लोक गोळा होतात. तूं नाहीं पाहिलेंस? आपल्याला कांहीं कमी पडणार नाहीं.

“बाबा मला एक गोष्ट सांगत होते. एका कोठल्या तरी सभेंत महाराष्ट्रांतील एका तरुणानें छानसे पद म्हटलें. त्याचा आवाज फार गोड होता. गोड असून पहाडी होता. त्या सभेंत लोकमान्य टिळक होते. त्यांनीं त्या मुलाची पाठ थोपटली. ते म्हणाले, ‘बाळ, तुला कांहीं कमी पडणार नाहीं. नुसते मनाचे श्लोक म्हणत जाशील तरी सोनें मिळवशील.’ खरेंच आपण होऊं भारतमातेचे भिकारी, भारतमातेची यात्रा करणारे तरुण यात्रेकरू. तुला आवाजाची अपूर्व देणगी आहे. ती हिंदुस्थानभर नेऊं.”

“आणि तुझ्या बोटांतील कला! कशीं आहेत तुझीं लांब बोटें. शरीरांतील कलेला जणुं फुटलेले कोंब! तुझ्या बोटांतील जादुगारी माझ्या बोटांत नाहीं. माझ्या बोटांत जेव्हां मी आंगठी घालतों, तेव्हां तुझीं बोटें मला आठवतात. मुदी घालायला गुणाचींच बोटें लायक असें मनांत येतें.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel